ताज्या बातम्या

धारावी मतदार यादीत ७०,००० मतदारांची हेराफेरी? काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : धारावीतील मतदार यादीत तब्बल ७०,००० मतदारांची पद्धतशीर हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. मतदार जागांमध्ये फेरफार करून निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर करण्याचा मोठा डाव रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याप्रकरणी बोलताना त्या म्हणाल्या, “धारावीतील प्रत्येक प्रभागातून ६,००० ते १०,००० मतदारांना त्यांच्या मूळ वॉर्डमधून पूर्णपणे असंबंधित वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. सोशल नगरसारख्या संपूर्ण परिसरातील मतदारांना दूरच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. हे चुकीने झाले नसून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केलेले स्थलांतर आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “जर केवळ शेजारच्या वॉर्डमध्ये गोंधळ झाला असता, तर ते समजू शकले असते. मात्र, मतदारांना लांबच्या वॉर्डमध्ये हलवण्यामागे स्पष्ट हेतू आहे — मतदारांना संभ्रमात टाकणे आणि गोंधळ निर्माण करणे.

डॉ. गायकवाड यांनी मतदारांच्या आक्षेप प्रक्रियेतील त्रुटींवरही रोखठोक टीका केली.

त्यांच्या म्हणण्यानुसार, “आता जी फॉर्म्स दिले जात आहेत, ते फक्त वैयक्तिक नोंदींसाठी आहेत. हजारो मतदारांना चुकीच्या वॉर्डमध्ये हलवण्याची सामूहिक तक्रार करण्याची कोणतीही सोय नाही. प्रत्येक हलवलेल्या मतदारासाठी स्वतंत्र फॉर्म भरावा लागणार हेच कायद्यानेच निराशा निर्माण करण्यासारखे आहे.


“एका व्यक्तीने काही दिवसांत १०,००० फॉर्म कसे भरायचे? संपूर्ण प्रक्रिया जानूनबुजून क्लिष्ट ठेवली आहे, म्हणजे लोकांनी आक्षेप दाखल करावा आणि त्याचा उपयोगही होऊ नये.

डॉ. गायकवाड यांनी आरोप केला की, ही कारवाई धारावीतील मतदारांची संख्या कृत्रिमरीत्या बदलून निवडणूक निकालावर परिणाम करण्याचा प्रयत्न आहे.
“धारावीच्या मतदारांना मतदानापासून दूर ठेवण्याचा हेतू स्पष्ट आहे. पण काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा देऊ. असे शेवटी डॉ. गायकवाड म्हणाल्या.

धारावीत मतदार यादीतील फेरफार प्रकरण पुढील काही दिवसांत राजकीय तापमान वाढवणार हे निश्चित आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top