मुंबई : टीईटी सक्ती आणि १५ मार्च २०२४ रोजीच्या अन्यायकारक संच मान्यतेच्या जीआरचा तीव्र विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना ५ डिसेंबर रोजीच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी होत आहेत. या आंदोलनाला शिक्षक भारती संघटनेनेही अधिकृत आणि जाहीर पाठिंबा दिला आहे.
शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शिक्षकांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांवर शासनाने तात्काळ ठोस निर्णय घेण्यासाठी हा लढा अपरिहार्य आहे. शिक्षक वर्गावर अन्याय करणाऱ्या निर्णयांना विरोध म्हणून शिक्षक भारती शाळा बंद आंदोलनात उतरते.”
यावेळी शिक्षक भारतीच्या सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ५ डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




