मुंबई : मुंबईत शाहिरीकलेच्या माध्यमातून लोककलेचा बाज कायम राखणाऱ्या शाहिरी लोक कलावंत मंचच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांची एकमताने निवड झाली आहे. दांडगा लोकसंपर्क आणि मनमिळावू स्वभावाचे अध्यक्ष लाभल्याने संस्था कार्याला गती मिळेल, अशी प्रतीक्रिया काशिनाथ माटल यांच्या निवडीवर सर्वत्र उमटून आलेली दिसते.
मंचची वार्षिक सर्वसाधारण सभा काल परेलमध्ये पर पडली. विषय पत्रिकेवर पदाधिकाऱ्यांची फेररचना हा विषय होता.परंतु विद्यमान अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण यांनी तत्पूर्वी राजीनामा दिल्या मुळे, पूर्वीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्यात आले.नव्याने संस्थेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असणारे काशिनाथ माटल यांच्यावर सर्वांनुमते अध्यक्षपदीधुरा सोपविण्यात आली आहे.ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रसिध्दी प्रमुखही आहेत.
सभेचे अध्यक्षस्थान मावळते अध्यक्ष शाहीर शांताराम चव्हाण यांनी भूषविले आणि खेळीमेळीच्या वातावरणात पुढील निवडणूका पार पडल्या.
सेक्रेटरीपदी प्रसिद्ध शाहीर मधु खामकर यांची आणि गिरणी कामगार संगीतकार महादेव खैरमोडे यांची खजिनदार म्हणून फेरनिवड झाली.उपसेक्रेटरीपदी महिला संघटक स्वरिता पाटकर यांची निवड झाली.
उपाध्यक्षपदी सेवाभावी संघटक रविंद्र पारकर यांची निवड झाली तर शाहीर शांताराम चव्हाण, शाहीर दत्ता ठुले आणि लोक कलेतील नामवंत संगीतकार मनोहर गोलांबरे यांची सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
“गाढवाचे लग्न” या अजरामर वगनाट्यात उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून लोकमानसावर ठसा उमटवून असलेल्या सुरेखा काटकर यांची संस्थेच्या समन्वयक म्हणून निवड झाली आहे.नव्या निवडीबद्दल सर्वच कलावंतांकडून समाधान व्यक्त होताना दिसते आहे.
आपण अधिकाधिक युथ कलावंताना शाहिरी लोक कलावंत मंचच्या कार्यक्रमात सक्रिय करु आणि मंचला नवी दिशा देताना सर्व बुजुर्ग कलावंताना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करु, असा संकल्प नवे अध्यक्ष काशिनाथ माटल यांनी सूत्रे स्वीकारताना केला आहे.




