ताज्या बातम्या

महिंद्रा अँड महिंद्रात विक्रमी वेतनवाढ १३०० कामगारांना ₹१७,९०० मासिक वाढ; ढोल–ताशांच्या गजरात स्वागत

प्रतिनिधी : जागतिक वाहन उद्योगातील अग्रगण्य महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागात महिंद्रा अँड महेंद्रा वर्कर्स युनियनने १३०० कामगारांना तब्बल ₹१७,९०० मासिक पगारवाढ मिळवून देत ऐतिहासिक यश संपादन केले.

या अभूतपूर्व पगारवाढीचे कामगारांनी ढोल ताशे आणि गुलाल उधळून जल्लोषात स्वागत केले.

कांदिवली प्लांटमध्ये मंगळवारी कामगारांच्या मोठ्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

युनियनच्या वतीने सरचिटणीस आमदार सचिन अहिर आणि अध्यक्ष रमेश ओटाली यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने चिफ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स विनय खानोलकर, व्हाईस प्रेसिडेंट ई–आर संग्रामसिंग देशमुख आणि प्लांट हेड टॉम थॉमस यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

युनियनचे नेतृत्व सांभाळणाऱ्या आमदार सचिन अहिर यांच्या तीस वर्षांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा यशस्वी पगारवाढीचा करार ठरला आहे.

कामगारांना संबोधित करताना आमदार सचिन अहिर म्हणाले की, या मोठ्या पगारवाढीसाठी ना संघर्ष झाला ना आंदोलन — परस्पर सामंजस्यातून हा करार झाला म्हणूनच तो आदर्शवत ठरला आहे.

“कारखाना टिकला तर कामगार जगेल आणि कामगार जगला तर युनियनचा विकास होईल” या तत्त्वावर काम केल्यामुळे उत्पादनवाढ झाली आणि त्यातून हा यशस्वी करार घडल्याचे त्यांनी नमूद केले.

२०१४ मध्ये १४०० कामगारांना कायम करून कंपनीचे संचालक कै. केशुबजी महिंद्र यांनी मालक–कामगार संबंधांची भक्कम संस्कृती घडवून दिली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

युनियनचे अध्यक्ष रमेश ओटाली म्हणाले की, सरचिटणीस आमदार सचिन अहिर यांचा कामगारांच्या श्रमाला न्याय मिळवून देण्याचा कटाक्ष, कामगारांचे योगदान, व्यवस्थापनाचे सहकार्य आणि करार समितीचे परिश्रम यामुळे हा ऐतिहासिक करार शक्य झाला.

करारानुसार पगारवाढीचे तीन टप्पे असे असतील — पहिला टप्पा ९४%, दुसरा ९७% आणि तिसरा १००%, तर कराराची मुदत साडेतीन वर्षे ठेवण्यात आली आहे.

आरोग्य सेवा आणि इतर सर्व विद्यमान सोयी-सवलती कायम ठेवून सर्व विभागांतील कामगारांना समान पद्धतीचा लाभ मिळेल याची युनियनने काळजी घेतल्याचे आमदार अहिर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार सचिव कृष्णकांत कोकाटे यांनी मानले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top