सातारा(विजय जाधव) : देशांतर्गत निवडक गावात जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थेमध्ये समुदाय सहभाग वाढविणे, हर घर जल योजनेतील प्रगतीचा आढावा, सेवा वितरण अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ‘सुजल संवाद’ कार्यक्रमासाठी देशभरातील निवडक गावांमधून सादरीकरणासाठी वाई तालुक्यातील वयगावची निवड झाल्याने गावाचा मान वाढला असून, येथील पाणीपुरवठा, नळजोडणी, वितरणव्यवस्था आणि जलव्यवस्थापनातील यश राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित झाले.
उपकार्यकारी अधिकारी प्रज्ञा भोसले, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी व आशा सेविका, जलसुरक्षक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन रचनात्मक संवाद साधला.
लोकसहभागातून आदर्श गाव संकल्पना साकार करण्यात अग्रेसर असलेल्या वयगाव ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमात रूपाली परीट, शुभांगी शेलार (पाणीपुरवठा विभाग) आणि स्वच्छ भारत मिशनच्या स्वाती जाधव यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. हर घर नळजोडणीची सद्यस्थिती, पाणी वितरणाचे नियोजन, जलस्रोत संवर्धनाची गरज यावर ग्रामस्थांना सोबत दिशादर्शक चर्चा झाली.
चौकट – “गुड टच – बॅड टच”
सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या वयगाव मध्ये रुपाली परिप यांनी सातत्याने परिश्रम घेत विविध स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत.तारुण्याच्या उंबरठ्यावर येण्यापूर्वी मुला मुलींना ‘गुड टच – बॅड टच’ या संवेदनशील विषयावर सारीका गवते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. शंका निरसन करत योग्य आहार आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.




