वाई (विजय जाधव) : वाई तालुका आज नाविन्यपूर्ण कामगिरीचा आदर्श ठरत आहे. पंचायत समितीकडून दर आठवड्याला नवे उपक्रम राबवले जात असून, संपूर्ण तालुका “उपक्रमशील वाई” म्हणून ओळख निर्माण करत आहे. तालुक्यात एका दिवशी तब्बल २८ पशुवैद्यकीय शिबिरांचे यशस्वी आयोजन करुन तालुक्यातील पशुधन संगोपन आणि संवर्धन करण्यास प्रोत्साहन देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. दिनकर बोर्डे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्या पुढाकाराने हे शिबिर मोठ्या प्रमाणात पार पडले.
तालुक्यातील १५ पशुवैद्यकीय संस्थांमार्फत २० नोव्हेंबर रोजी आणि उर्वरित ३ संस्थांमध्ये २१ नोव्हेंबर रोजी पशुधन कार्य मोहीम राबविण्यात आली.
शिबिरात कृत्रिम रेतन – १२, गर्भधारणा तपासणी -३९, वांझ तपासणी – ८६, औषधोपचार – २३०, जंत निर्मूलन – ३२७०, गोचिड निर्मूलन – ४५० पशुपालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तज्ञ अधिकाऱ्यांनी पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना, पशुसंगोपन, आणि शास्त्रीय पद्धतींचे मार्गदर्शन दिले.या भव्य उपक्रमाला गावोगावी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अधिकारी, कर्मचारी आणि पशुपालक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शिबिरे उत्कृष्ट यशस्वी ठरली.

उपक्रमशील वाई तालुका
लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी करत रहा. प्रशासन नेहमीच सकारात्मक साथ देत सोबत असेल. वाई तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने ही कामगिरी ग्रामीण विकासाला प्रेरणा देणारी ठरत असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केले.




