मुंबई : पुरोगामी राष्ट्रीय विचाराचे दैनिक हिंदुस्थानच्या सामाजिक बांधिलकीला अधोरेखित करणारा दै. हिंदुस्थानच्या आधारवड स्व. प्रभा अरूण मराठे यांच्या तेजस्वी स्मृतीला उजाळा देणारा प्रभास सन्मान सामाजिक सेवा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अमरावती येथील श्याम चौकातील जोशी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. आपल्या साध्या, संयमी आणि परोपकारी कार्याने असंख्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या प्रभाताईंच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.
यंदाचा तिसरा प्रभास सन्मान मनोरुग्ण सेवेच्या क्षेत्रात अपूर्व योगदान देणाऱ्या, नंददीप फाऊंडेशन, यवतमाळचे संस्थापक संदीप शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती, पुनर्वसन आणि संवेदनशील सेवाभावाने ते करत असलेल्या कार्यासाठी स्व. प्रभा अरुण मराठे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.
दै. हिंदुस्थानच्या या प्रभास सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित राहणार आहेत. तर या सोहळ्यात सुप्रसिद्ध ज्येष्ठ वक्ते, प्रबोधनकार आणि अमृतवक्ता विवेक घळसासी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. समाजातील सकारात्मक बदलांसाठी कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तींचा गौरव करण्याचा हा दै. हिंदुस्थान चा सेवाभावी उपक्रम आहे. यापूर्वी सामाजिक कार्य करणाऱ्या दोन सेवाभावी संस्थांना या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या तिसऱ्या सेवा सन्मानाने हा प्रभास सन्मान अधिक प्रभावी ठरणार आहे. या प्रेरणादायी सोहळ्याला समस्त अमरावतीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आवाहन दै. हिंदुस्थान व मराठे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




