ताज्या बातम्या

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सिमांकन व हक्कांवर कोळी जमात ट्रस्टचा निषेध; सरकारला आंदोलनाचा इशारा

धारावी – धारावी कोळी जमात ट्रस्ट यांच्या वतीने धारावी कोळीवाडा, टी-जंक्शन बस स्टॉप मागे शनिवारी (दि. १५ नोव्हेंबर २०२५) आयोजित पत्रकार परिषदेत पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित गंभीर अनियमितता, चुकीचे सिमांकन व हक्काबाबत मुद्दे उपस्थित केले.

कोळी जमात ट्रस्टने २०१८ मधील भूमि अभिलेख विभागाचे अपूर्ण सिमांकन, कोळीवाडा पुनर्विकास प्रकल्पातून वगळणे, चुकीचे क्षेत्रफळ दाखविणे, १९९० साली म्हाडाकडून दिलेली खोटी आश्वासने, वहिवाटीची व मासे सुकविण्याची जागा बळकावणे, आरटीआयद्वारे उघड झालेला शासनाचा चुकीचा व्यवहार व कोळीवाड्याच्या पारंपरिक सण-उत्सवांच्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न यावर थेट आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

या परिषदेला अध्यक्ष डॉमणिक किणी, जोसेफ कोळी, सेक्रेटरी दिगंबर कोळी, देवयानी कोळी तसेच कोळी समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोळी बांधवांनी सांगितले की, सरकारने आमच्या मागण्या ऐकल्या नाहीत, आम्हाला विश्वासात घेतले नाही, किंवा हक्काची जागा परत दिली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडू. गरज पडली तर जीव देण्यासही मागेपुढे पाहणार नाही. दिगंबर कोळी यांनी माहिती अधिकाराखाली मिळालेल्या तपशीलात अनेक गोष्टी शासनाकडून लपविण्यात आल्याचा आरोप केला. उन्हाळी अधिवेशनात विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनी मुद्दा उपस्थित करूनही कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात युवा सेना नेते आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार डॉ. ज्योती गायकवाड तसेच दादर-माहीमचे आमदार महेश सावंत यांच्याकडे हा मुद्दा ठामपणे मांडण्याची तयारी असून शिष्टमंडळ नागपूरला जाऊन सरकारकडे निवेदन देणार असल्याची माहिती देण्यात आली.

धारावी कोळीवाडा हा मुळ मुंबईकर व भुमिपुत्रांचा वारसाहक्काचा प्रदेश असल्याचा ठाम पुनरुच्चार करत कोळी समाजाने पुनर्विकास प्रकल्पातील त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top