ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी – रमेश चेन्नीथला

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून सर्वच्या सर्व २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुंबई महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना स्पष्ट केले. या निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून लोकसभा निवडणुकीसारखा विजय मिळवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज मुंबई काँग्रेसतर्फे एक दिवसीय ‘लक्ष्य २०२६’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करणे व विजयरथ पुढे नेण्याचे उद्दिष्ट या शिबिरातून अधोरेखित झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. कार्यक्रमाला AICC सचिव व मुंबई प्रभारी यु. बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षाताई एकनाथ गायकवाड, सहप्रभारी रियाज रेहाना, बी. एम. संदीप, राष्ट्रीय सचिव व तेलंगणा सहप्रभारी सचिन सावंत, विधीमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, आमदार अस्लम शेख, आमदार डॉ. ज्योती गायकवाड तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाशी तरुणवर्ग तसेच नवीन लोकांना जोडले पाहिजे. बुथ स्थरापर्यंत काम केले पाहिजे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवण्याचे काम करा. पक्षाने ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. पदे ही शोभा वाढवण्यासाठी दिलेली नाहीत, जे काम करणार नाहीत त्यांना पदमुक्त केले जाईल असा इशारा चेन्नीथला यांनी यावेळी दिला.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यावेळी म्हणाल्या की, तीन वर्षापासून बीएमसीमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, या काळात महानगरपालिकेत भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. कोट्यवधी रुपये लुटले आहेत. सहा हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी खर्च केल्या आहेत. मुंबईतील महत्वाच्या जागा काही खास लोकांना कवडीमोल भावाने दिल्या जात आहेत. काँग्रेसने बीएमसी मधील भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे चव्हाट्यावर आणलेली आहेत. आगामी काळातही भाजपा महायुतीचा भ्रष्टाचार बाहेर काढला जाईल. काँग्रेस पक्ष मुंबईकरांचा आवाज बनून मुंबईतील पाणी, वाहतूक समस्या, भ्रष्टाचार, रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण यावर आवाज उठवत आहे. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी दिला जात नाही पण मुंबई महापालिकेचा निधी पार्टी फंड असल्यासारख्या महायुती त्यांच्या पक्षातील लोकांना वाटत आहे.

खा. गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत समविचारी छोट्या पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा आमचा विचार असून मुंबईतील सर्वच्या सर्व २२७ जागा लढण्याची तयारी आहे. निवडणुका दोन महिन्यावर आल्या तरी निवडणूक आयागाने अद्याप पुरवणी मतदार यादी दिलेली नाही. मतदान आठ दिवस असताना मतदार यादी येते मग यावर काम कधी करायचे. या याद्यांमध्ये घोळ केला जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. मतदार याद्या तपासा, बुथ लेवलवर जाऊन काम करा आणि पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून आण्यासाठी काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आपल्यासमोर मोठे आव्हान असले तरी डगमगून जाता कामा नये. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पराभवाने खचून जात नाही, आता रडायचे नाही तर लढायचे आहे हे लक्षात ठेवा, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकच लक्ष्य ठेवा आणि विजय मिळवण्यासाठी काम करा, असे आवाहन करताना त्यांनी भाजपा व आरएसएसवर तुफान हल्ला केला. आपली लढाई ही शुद्ध विचाराची आहे. भाजपा व आरएसएसच्या स्वप्नातील भारत व आपल्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्म सोडायला लावणारे हेच मनुवादी विचाराचे लोक होते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई काँग्रेसचे सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश यावेळी म्हणाले की, ही निवडणूक सत्य आणि असत्य, नीतिमत्ता आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. या आव्हानाला तोंड देण्यास काँग्रेस पक्ष सक्षम आहे. मुंबईतील सर्व २२७ जागा लढवण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे.

आमदार भाई जगताप यावेळी म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर त्यांच्या पाठीशी पक्षाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. २२७ उमेदवार उभे करण्याची क्षमता काँग्रेस पक्षात आहे याचा अर्थ प्रत्येक वार्डात काँग्रेस पक्षाची ताकद आहे, असे भाई जगताप म्हणाले.

आरपीआयचे राजेंद्र गवईही या शिबिराला उपस्थित होते. तर शिबिराच्या दुपारच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, निरंजन टकले, अशोक वानखेडे, राम पुनियानी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top