मुंबई – भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयाच्या आदेशानुसार हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मुंबई रिफायनरी आणि लोकमान्य शिक्षण संस्था संचलित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या तीन किलोमीटरच्या भव्य रॅलीने चेंबूर परिसर दुमदुमला. रॅलीत विद्यार्थ्यांनी आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडवणारी वारली पेंटिंग्स, वारली नृत्य, पथनाट्य तसेच विविध प्राण्यांचे आकर्षक सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधले. “स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई”, “झाडे लावा – झाडे जगवा” अशा घोषणांमधून पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि उत्तर मुंबईचे शिक्षण निरीक्षक मा. मुस्ताक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य दिव्य स्वरूपात पार पडली. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक अमोगसिद्ध पाटील, डॉ. प्रफुल्ल विशे तसेच एससी-एसटी एम्प्लाई असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अमर सर उपस्थित होते.बॉम्बे ट्रॅफिक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोमेश्वर खाटपे यांनी स्वतः रॅलीत सहभागी होत वाहतूक व्यवस्थापन पाहिले. तसेच RCF पोलीस स्टेशन आणि ट्रॉम्बे वाहतूक पोलीस स्टेशन यांनी चोख बंदोबस्त पुरवून कार्यक्रम सुरळीत पार पाडला.भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य व आदिवासी समाजासाठी केलेल्या योगदानाचे स्मरण करून जनजागृतीच्या माध्यमातून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.




