धारावी

: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धारावी विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री. वसंत शिवराम नकाशे यांनी प्रभाग क्रमांक १८६ मधील नागरिक, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हृदयस्पर्शी आभारपत्र सार्वजनिक केले आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांनी दिलेल्या विश्वास, प्रेम आणि सहकार्याबद्दल त्यांनी मनापासून ऋण व्यक्त केले.
नकाशे म्हणाले की, “गेल्या कित्येक वर्षांपासून आपण मला घरच्यासारखे मानले, विश्वासू कार्यकर्ता म्हणून साथ दिली. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि मायबाप मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
प्रभाग १८६ हा आगामी निवडणुकीत मागासवर्ग (महिला) म्हणून आरक्षित झाल्यामुळे आता आपली उमेदवारी शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, पक्षाकडून या ठिकाणावरून जी भगिनी निवडणूक लढवेल, तिला नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच प्रेम व भरभरून पाठिंबा द्यावा, अशी त्यांनी विनंती केली.
नकाशे यांनी सांगितले की, प्रभागात झालेले विकासकामे आणि नागरिकांशी असलेले नाते हे “अतूट” असून ते कधीही तुटणार नाही. “मी या प्रभागाला निरोप देत नाही; तर आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. नवीन प्रवासाला सुरुवात करताना आपला प्रेमळ आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत राहतील, याची मला खात्री आहे,” असे नकाशे यांनी म्हटले.
शेवटी त्यांनी “जय महाराष्ट्र!” चा जयघोष करत नागरिकांचे पुनःश्च आभार मानले.




