ताज्या बातम्या

पुनर्विकासाठी धारावीतून… अपेक्षित पाठिंबा नाही,अदानी कंपनी हैराण : धारावी बचाव आंदोलन चा आरोप

मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही धारावीची आहे.या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी अपेक्षित झोपडपट्टीवासियांचे समर्थन अजूनही अदानी कंपनीस मिळालेले नाही.यामुळे अदानी कंपनी हैराण झाली आहे,असा आरोप धारावी बचाव आंदोलन या संघटनेने केला आहे.धारावीत सव्वा लाख झोपड्या आहेत.त्यापैकी सुमारे ८० टक्के लोकांनी आपली झोपडी,घरांची कागदपत्रे ही अदानी कंपनी वा मुंबई पालिकेस दिलेली नाहीत.या झोपडपट्टीवासियांनी सर्व्हेक्षणासाठी आलेल्या अदानी कंपनीच्या लोकांना झोपड्यांवर नंबरही टाकून दिलेले नाहीत,असा दावाही धारावी बचाव आंदोलनने केला आहे.
धारावी बचाव आंदोलनने धारावीत जनजागृती अभियान सुरु केलेले आहे.या अभियाना दरम्यान बोलताना हा दावा या आंदोलनातील नेत्यांनी केला आहे.आम्हाला घरे धारावीत द्या, पात्र-अपात्र असा भेदभाव नको, प्रत्येकाला ५०० चौ.फु.चे घर द्या,घराच्या बदल्यात घर, दुकानाच्या बदल्यात दुकान, व्यवसायाच्या जागेच्या बदल्यात व्यावसाय सुलभ जागा द्या आदी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन अदानी कंपनी व सरकारने द्यावे.तसेच जोपर्यंत अदानी कंपनी हे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत अदानी कंपनीस किंवा मुंबई पालिकेस आपले घर, दुकान याची कागदपत्रे देऊ नये याविषयीची माहिती देण्यासाठी धारावी बचाव आंदोलनने दर दोन दिवसा आड जनजागृती अभियान धारावीतील प्रत्येक गल्ली गल्लीत जाऊन सुरु केलेले आहे.
गेल्या ४\५ दिवसात हे अभियान महात्मा गांधी रोड,लक्ष्मी बाग शिवसेना शाखा, मदिना मशिद, मच्छिगल्ली, साईनगर आणि संगमनगर,सोशलनगर मध्ये राबवण्यात आले.या अभियानास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.या अभियानावेळी लोक स्वतःहून पुढे येऊन बोलत आहे की आम्ही अदानी कंपनीस कागदपत्रे देणार नाही.धारावीतच घर देणार असे आश्वासन या कंपनीने आम्हास लेखी द्यावे तरच आम्ही आमच्या घराची- झोपडीची कागदपत्रे देणार असेही हे झोपडपट्टीवासिय उघडपणे या अभियाना प्रसंगी म्हणाले आहेत.
कावले चाल येथील सभेत बोलताना बाबुराव माने म्हणाले धारावीतील मेघवाडी, आझादनगर, टिळक नगर आदी ठिकाणची पात्र-अपात्र लोकांची यादी अदानी कंपनीने जाहीर केली.यात ८०टक्के लोक अपात्र केलेले आहेत.याचा अर्थच हा आहे की धारावीकरांना कर्जत, कल्याण, भिवंडीस हुसकावून लावण्याचा अदानीचा डाव आहे.पण हा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा माने यांनी दिला.
माने पुढे म्हणाले धारावीत सव्वा लाख झोपड्या आहेत.यापैकी १लाख १५ हजार-किंवा ८० टक्के लोकांनी आपली घरे – झोपड्यांची कागदपत्रे ही अदानी कंपनीस किंवा पालिकेस दिलेली नाहीत.याचा अर्थच हा आहे की अदानी कंपनीने लोकांना धारावीतच ५०० चौ.फु.चे घर द्यावे.आणि हे आश्वासन अदानी कंपनीने लेखी द्यावे.धारावीतील लोकांचा असा किरकोळ प्रतिसाद अदानी कंपनीस लोकांकडून मिळत असल्याने अदानी कंपनी हैराण झाली आहे.असा आरोप बाबुराव माने यांनी केला.
झोपड्यांचे सर्व्हेक्षण करणे,त्यांची कागदपत्रे गोळा करणे यासाठी अदानी कंपनीने मोहीम राबवली.कॅम्प,शिबीर घेतले.तरीही अदानी कंपनीस धारावीतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही याचा अदानी कंपनीने गांभीर्याने विचार करावा असेही बाबुराव माने यांनी म्हटले आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास या दोन शब्दांचा अर्थ जेथे झोपडपट्टी तेथेच त्या झोपडपट्टीचा विकास असे गेल्या अनेक वर्षांपासूनचे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे.हे धोरण आता बदलले आहे. अदानीला जमिन धारावीची आणि धारावीतील झोपडपट्टीचा विकास धारावी बाहेर असे धोरण बनलेले आहे.या धोरणासाठी अदानीस मुलुंड,देवणार डम्पिंग ग्राऊंड आणि दुर्मीळ झाडे वृक्ष यांच्या म्हणजेच बाॅटॅनिकल गार्डनसाठी राखीव असलेली कुर्ला मदर डेअरीची जागा ही अदानी कंपनीस कशासाठी दिलेली आहे हे जनतेला समजत नाही असे समजू नये असेही माने यांनी म्हटले आहे.

धारावी बचाव जनजागृती अभियानात आपचे एन.आर.पाॅल,इशरत खान,आयुब शेख,डाॅ.जावेद अहमद खान,रेणुका शिवपुरे, बसपाचे शामलाल, शेकापच्या साम्या कोरडे, सुभाष पाखरे,मुशिरभाई आदींसह विविध पक्षाचे कार्यकर्ते, झोपडपट्टीवासिय या अभियानात सहभागी झाले होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top