मुंबई : भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. याबाबत आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.
“मित्रा”च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
