प्रतिनिधी : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जलव्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारे ‘सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार – 2024’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम पुरस्कार पटकाविला असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एका राष्ट्रीय पुरस्काराचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. महानगरपालिकेच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.श्री.सी. आर. पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून 18 नोव्हेंबरला नवी दिल्लीत महामाहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. देशातील प्रत्येक स्तरावर जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेला चालना देणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश असून ‘जल समृद्ध भारत’ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या पुरस्कारांसाठी देशभरातून 751 प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअरकार्ड पद्धतीने विजेत्यांची निवड केली. यामध्ये स्थानिक स्वराज संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिका देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय जलपुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.