कुडाळ (अजित जगताप)

: जावळी तालुक्यात जनतेच्या आरोग्यासाठी दूरदृष्टीने ४५ वर्षांपूर्वी सोमर्डी गावचे सुपुत्र व जावळीचे माजी पंचायत समिती सभापती संपतराव परामणे यांनी स्वतःची जागा देऊन सोमवारी ग्रामीण रुग्णालय उभे केले. आज या रुग्णालयाच्या नूतनीकरणाने खऱ्या अर्थाने सुमारे ३० गावांसाठी हे आरोग्य मंदिर बनले आहे.
पाचवड ते पाचगणी रस्त्यावरील कुडाळ नजीक असलेल्या सोमर्डी गावात रस्त्यालगतच हे आरोग्य मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी गैरसोय होत असल्याने अनेक रुग्णांना इतर खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत होते. याबाबत वारंवार नकारात्मक तक्रारी येतच होत्या. परंतु राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, संदीप परामणे आणि ग्रामस्थांच्या सकारात्मक पाठपुराव्याने आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आल्याने हे सरकारी नव्हे तर खाजगी रुग्णालय वाटू लागलेले आहे.
सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात दररोज ग्रामीण भागातून शंभर ते दीडशे रुग्ण उपचार घेऊन समाधान व्यक्त करत आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सुदृढ विचारांची पेरणी झालेली आहे. या ठिकाणी नियमित प्रमाणे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व इतर आरोग्याशी निगडित गोष्टी सातत्याने घडत असल्याने खऱ्या अर्थाने या आरोग्य मंदिरात आरोग्याची काळजी घेतली जात आहे. आजारी पडू नये किंवा आजाराचं निदान व्हावे. यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रणा तसेच आजाराचे निदान करणाऱ्या तपासणी, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया विभाग आणि सुसज्ज व स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारे कक्ष म्हणजेच आरोग्य मंदिरातील गाभारा वाटत आहे.
या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या तपासणी करण्यासाठी तीन वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. जास्तीत जास्त गरीब रुग्णांना त्याचा लाभ व्हावा. या हेतूने प्रामाणिकपणाने सेवा करणारे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यामुळे खऱ्या अर्थाने गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव, डॉ. अथर्व पवार, डॉ. पवन कुरुलिये, अधिपरिचारिका पुनम फणसे, प्रिया डोईफोडे, संगीता गायकवाड, सना डांगे आणि औषध व तंत्र विभागाचे प्राजक्ता गायकवाड, विजय पांढरपट्टे तसेच सुरक्षारक्षक गणेश कदम आदी मान्यवर सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहेत.
पाचगणीच्या पायथ्यापासून ते जावळी व वाई तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या गावातूनही या ठिकाणी उपचार मिळत आहे. पूर्वी शस्त्रक्रिया विभाग यंत्रणा अपुरी असल्यामुळे बंद होती. परंतु, अलीकडच्या काळामध्ये एक खिडकी एक योजना सारखे सर्वच आरोग्याशी निगडित उपचार या रुग्णालयात उपलब्ध झालेले आहेत. रुग्णांचे केस पेपर ते त्यांना अत्याधुनिक उपचार पद्धतीने तातडीने घरी सोडण्यापर्यंत सुविधा पुरवले जात आहे.
सोमर्डी स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग व उपयुक्त सूचना अनमोल ठरलेले आहेत. त्यांचेही रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत.
_______________________
फोटो — सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची काळजी घेताना वैद्यकीय अधिकारी व मान्यवर (छाया- अजित जगताप, सोमर्डी )




