मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश देण्याचा अधिकार न्यायालयाला नाही.
प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला की, विमानतळाच्या नामांतराचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि यामुळे भविष्यात मुंबई–नवी मुंबई परिसरात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाचा अशा प्रकारच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा तिढा अद्याप कायम राहिला आहे. ✈️
