
मुंबई (शांताराम गुडेकर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशीनिमित्त चेंबूर येथील चरई हिंदू स्मशानभूमीत विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. एकादशीनिमित्त होमहवन, षोडशोपचार पूजा अर्चा, आरती आणि भंडारा चा कार्यक्रम झाला. दिव्यांच्या रोषणाईत स्मशानभूमी जगमगली होती. या विशेष पूजेत काळभैरवाला मद्य अर्पण करण्याची परंपरा कायम राखण्यात आली. यावेळी उपस्थित भक्तांनी खास काळभैरवाला दारू अर्पण केले. यावेळी भाविक लोकांनी स्मशानभूमीभोवती हजारो दिवे लावून आपल्या पूर्वजांची पूजा केली.कालभैरवाला मद्य अर्पण करण्याची परंपरा पाच दशकांपूर्वी दिवंगत सिंधी बांधव – प्रीतम दास चेल्लानी यांनी सुरू केली होती आपल्या मामा ची परंपरा पुढे कायम अखंडितपणे सुरू ठेवण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ समाजसेवक रमेश लोहाणा यांच्या माध्यमातून दरवर्षी एकादशीच्या दिवशी आयोजित करण्यात येत आहे. या वर्षी सुद्धा रमेश लोहाणा यांनी मंगळवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी चेंबूर येथील चरई स्मशानभूमीत कालभैरवाला मद्य अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता याला विभागातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी स्मशानभूमी भोवती सर्वत्र दिवे लावले. त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत आयोजक रमेश लोहाणा यांनी सांगितले की, मुंबईतील चेंबूरमधील हे एकमेव स्मशानभूमी आहे, जिथे कार्तिकी एकादशीला कालभैरवाला दारू दिली जाते ही परंपरा माझ्या मामांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, सफल ग्रुपचे संजय असराणी, शिवसेना शिंदे गटाचे आमदार तुकाराम काते, मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांचे सहकार्य लाभले, यावेळी जामा स्वीट चे मालक गोविंद शेठ आणि महाराज यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
