मुंबई : राज्य शासनातील प्रत्येक संवर्गातील पदांचे कार्य व जबाबदाऱ्या कालानुरूप बदलल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, २०२६ हे पदभरतीचे वर्ष ठरेल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित राज्य रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्त्वावरील व लिपिक संवर्गातील एकूण १०,३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाची संस्थात्मक बांधणी बळकट करणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्य शासन अधिक सक्षम व गतिशील करण्यासाठी सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण आणि एमपीएससीमार्फत पारदर्शक भरती प्रक्रियेवर भर दिला आहे. आतापर्यंत ८० टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित लवकरच निकाली काढण्यात येतील.”त्यांनी पुढे सांगितले की, अनेक विभागांचे नियम ५० वर्षे जुने होते, मात्र तंत्रज्ञान व बदलत्या परिस्थितीमुळे पदांचे स्वरूप बदलले आहे. म्हणूनच सेवा प्रवेश नियम अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अनुकंपा तत्त्वावर नियुक्तींना न्याय
मुख्यमंत्री म्हणाले, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या या उपकार नसून शासनाची जबाबदारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे हे राज्याचे कर्तव्य आहे.यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का प्रकाश मोरे हिला विशेष नियम शिथिल करून अनुकंपावर नोकरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार : १० हजारांची पदभरती हा ऐतिहासिक निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,आजचा दिवस महाराष्ट्राच्या रोजगार इतिहासात ऐतिहासिक आहे. शासनाने अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ८०% प्रलंबित प्रकरणे निकाली काढली असून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणला आहे. प्रत्येक फाईल व निर्णयामागे एक जिवंत कथा असते. त्यामुळे जबाबदारी, निष्ठा आणि पारदर्शकता या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शक तत्त्वे ठरली पाहिजेत.प्रदेशनिहाय उमेदवारांचे वाटप
या नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक ३,०७८ उमेदवार कोकण विभागातून, २,५९७ विदर्भातून, १,७१० मराठवाड्यातून, १,६७४ पुणे विभागातून, तर १,२५० उमेदवार नाशिक विभागातून आहेत.