प्रतिनिधी : शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली भाजपा महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा सरकार विरोधातील जनसामान्यांचा आवाज दडपण्यासाठी आणलेला आहे. संविधानाने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा हा कायदा आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे पुरेसे सक्षम आहेत त्यामुळे जनसुरक्षा कायदा रद्द करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोर्ट येथील पुतळ्यापासून मंत्रालय जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्चचे काढण्यात आला. या मोर्चात खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार अमीन पटेल, शिवसेना (उबाठा) आमदार सचिन अहिर, माकपाचे प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, प्रणिल नायर, कचरू यादव, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती आणि सामाजिक संस्था, संघटना व इतर समविचारी पक्ष, संघटना यांचे सदस्य व पदाधिकारी सहभागी झाले होते.
खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, लोकशाही व संविधान हा देशाचा आत्मा आहे, सत्य, अहिंसा व सद्भाव हा देशाचा गाभा आहे परंतु मागील काही वर्षापासून लोकशाही व संविधानाची पायमल्ली केली जात आहे. विरोधकांचा आवाज दडपला जात आहे, लोकांचे प्रश्न मांडण्याचा लोकप्रतिनिधींचा हक्क सुद्धा हिरावून घेतला जात आहे. देशात लोकशाही व संविधान टिकले पाहिजे यासाठी हा शांती मार्च काढण्यात आलेला आहे, असे खासदार गायकवाड म्हणाल्या.