पाटण(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण निर्मितीने वीज व पाण्याचा आणि जलसिंचनाचा प्रश्न सुटला मात्र निगरगट्ट राज्यकर्त्यांच्या आळशीपणामुळे कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत. पाटणचे सुपुत्र पालकमंत्री आणि जिल्ह्याचे वाईचे सुपुत्र मदत व पुनर्वसन मंत्री असूनही प्रश्न सुटू शकला नाही. हिरवा लिंबू कडकपत्ता सरकार झाले बेपत्ता… आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा असे म्हणण्याची पाळी कोयना धरणग्रस्तांवर आली आहे.
याबाबत धरणग्रस्तांनी माहिती दिली की, स्वतःला धरणग्रस्त मानणाऱ्या अनेकांनी सत्तेची ऊब घेतली. मंत्रिमंडळात स्थान मिळवले पण धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत त्यांचा पुनर्वसनाचा सायरन वाजू शकला नाही. धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत खूप मोठा दबाव टाकण्यात येऊन सुद्धा पाटण जावळी महाबळेश्वरचे धरणग्रस्त एकवटले होते. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे समजून धरणग्रस्तांनी कोयना नदीत जलसमाधी आंदोलनाचा पवित्र घेतला. विजया दशमी दिनी महात्मा गांधी जयंतीला त्यांच्या विचाराला अभिवादन करून धरणग्रस्तांनी थेट कोयना नदीत उडी घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोयना धरणग्रस्तांचे नेते चैतन्य दळवी, मोहन कांबळे, संदीप देवरुखकर, महेश शेलार, सचिन कदम, अनुसया कदम, शिवाजी कांबळे, गजाबाई कदम, जाहीरउद्दीन शेख, संतोष जाधव, जगन्नाथ कदम यांच्यासह अनेक धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी बैठक लावण्याचे पत्र दिले.कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ६५ वर्षांनंतर आजही सुटू शकलेला नाही.कोयनाच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील अनेक धरणग्रस्तांची परवड सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख बारा धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी आजपर्यंत विविध धरणग्रस्तांच्या संघटनेने अनेक आंदोलने,उपोषणे केली. कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सुटावेत म्हणून मतदानही केले. आता मत वाया गेल्याच्या पश्चाताप कोयना धरणग्रस्तांना करावा लागत आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) गांधी जयंतीदिनी सकाळी १०
वाजता कोयनानगर येथील प्रसिद्ध नेहरू उद्यानानजीक
शिवाजीसागर जलाशयात जलसमाधी
घेण्यासाठी कोयना धरणग्रस्त नदीच्या पात्रात उतरले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील साहेब पोलीस निरीक्षक वलेकर ,महसूल विभागाचे जंगम आदी अधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना
या आंदोलनाची निवेदनाद्वारे कल्पना दिली होती. कोयना संग्राम धरणग्रस्त, अभयारणग्रस्त संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष चैतन्य दळवी, धरणग्रस्त नेते संतोष जाधव यांनी आंदोलनाची पूर्ण तयारी केली होती. आज कोयना धरणग्रस्तांना कोयना नदी पात्रात धरणग्रस्तांना उतरण्याची वेळ आणली. महात्मा गांधींनी सत्याग्रह केला होता आणि ब्रिटिशांना चले जाव इशारा दिलाअशाच पद्धतीने कोयना धरणग्रस्तांनी आता निर्भीडपणे व विचारपूर्वक मतदान करावे . मतदान केंद्रात जाताना आमच्या मागण्या मान्य करा… नाहीतर खुर्च्या खाली करा.. हे मतदान करताना सिद्ध करून दाखवावे असाही सूर उमटला आहे.
कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये किती क्षेत्र घ्यायचे आहे,हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे अनेक विकासकामांवर बंधने येत आहेत. बफर झोनमधील पर्यावरण विकास समित्यांचे
काम कायद्याच्या कक्षेत तयार केलेल्या
आराखड्यानुसार चालल्या पाहिजेत. मात्र तसे न होता संबंधित निधी पडून रहात आहे, असे दळवी यांनी सर्वसामान्य माणसांसाठी झटणाऱ्या पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. कोयना धरणग्रस्तांनी विजयादशमीनिमित्त आपल्या दारात तोरण.. बांधण्याऐवजी आंदोलनाचे धोरण पूर्ण केल्याबद्दल इतर धरणग्रस्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.
______________________________________
फोटो – कोयना धरणग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन सहभागी झालेले नेते व धरणग्रस्त( छाया– अजित जगताप पाटण)