मुंबई : ‘गावभेटीतून मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना’ला गती देण्यावर भर देण्यात येत असून या अभियानांतर्गत होणाऱ्या ग्रामसभा व उपक्रमांना वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम राबविण्यात सक्रिय सहभाग घेवून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, राज्यात या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली असून राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. अभियान अंतर्गत गावांमध्ये चांगली कामे होत असून या अभियानाला अधिक प्रभावी बनविण्यासाठी ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा पातळीवरील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी गावांमध्ये ग्रामसभांना उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेवून गावकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे.
अभियान अंमलबजावणीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील विविध जिल्ह्यातील गावांमध्ये जाणार आहेत. मी स्वतः दोन महिने अभियान कालावधीत राज्यातील सर्व भागातील गावात जात असून यातून गावातील विकासकामांना देखील गती मिळणार आहे, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियान महत्त्वपूर्ण असून यातील विविध बाबींची अंमलबजावणी करताना गावातील रस्ते, शाळा यासह विविध सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर २०२५ रोजी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियान ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये पारदर्शक प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार, पर्यावरण, कर वसुली, लोकसहभाग या बाबींचा समावेश आहे. एकूण १०० गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.
मंत्रालयात अभियानाच्या आढाव्यासाठी झालेल्या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.