प्रतिनिधी : संपूर्ण देशभरात संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संविधान साक्षर नवी मुंबई शहर’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून ‘घरोघरी संविधान’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
या अंतर्गत संविधानाच्या उद्देशिकेची पोस्टर्स घरोघरी वितरित करण्यात आली आहेत तसेच संविधानाविषयी जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने विविध स्तरांवर ‘संविधान साक्षर कार्यशाळा’ आयोजनास सुरूवात केली. त्यामध्ये नागरिकांचा वाढत्या प्रमाणात उत्साही सहभाग लाभत आहे.
अशाच प्रकारची संविधान साक्षर कार्यशाळा सिडको महामंडळाच्या अधिकारी, कर्मचारीवृंदांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली. यामध्ये 150 हून अधिक सिडकोच्या अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होऊन संविधानाची तत्वे, मूल्ये जाणून घेतली तसेच दैनंदिन जीवनात संविधानाचा अंगिकार याविषयी माहिती घेतली.
संविधान अभ्यासक व लेखक श्री.सुरेश सावंत यांनी आपल्या व्याख्यानातून भारतीय नागरिक म्हणून आपल्याला राज्यघटनेची माहिती असणे का आवश्यक आहे याचे विवेचन करीत शासकीय कर्मचारी तसेच एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे? याविषयी मार्गदर्शनपर भाष्य केले. समाजसेवक श्री.दशरथ गंभीरे यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले व सल्लागार श्रीम.संध्या अंबादे यांनी आभारप्रदर्शन केले.
राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूह वाचन करून कार्यशाळेची सांगता करण्यात आली. सिडको अधिकारी, कर्मचारी यांनी आज संविधान म्हणजे काय हे ख-या अर्थाने जाणून घेता आले असे अभिप्राय देत कार्यशाळा आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.