सन 2003 मध्ये “वेडा वृंदावन” या नाटकातून आवड म्हणून रंगभूमीशी नाते जुळले…. पुढे ही आवड राहिली नाही… ती गरज झाली… कारण घरची अत्यंत गरिबी… जीवनाशी संघर्ष करायचा म्हणजे काहीतरी करायला हवे होतेच आणि मग नाटकाकडे वळले, मानधन घेऊन काम करू लागले, आयुष्याचा प्रवास तिथूनच सुरू झाला असे भावपूर्ण उद्गार रक्षिता महेश पालव हिने काढले.
सध्या ती स्टेट बँक कॉलनी, कृष्णा अपार्टमेंट मध्ये स्वतःच्या घरात राहते. सुरुवातीचा काळ हा फारच भयावह होता… त्यात मुलांना वाढविणे त्यांचे शिक्षण, अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना तिला नाटकाचा मोठा आधार होता.
अजिंक्यतारा , संकल्प कला मंच, कलारंग वरवडे, अशा संस्थांमधून तिने काम करण्यास सुरुवात केली. चांदणे शिंपीत जा, मी माझ्या मुलांचा, कुसुम मनोहर लेले, आई रिटायर होते, माझं काय चुकलं?, एखाद्याचं नशीब, दिवसा तू रात्री मी, या सर्व नाटकांचे मिळून 250 पेक्षा जास्त प्रयोग झाले. शिवाय तो येणार आहे, रुक्ष, दिवा जळू दे सारी रात, माझ्या सासरच्या मंदिरी, एक डाव भटाचा, शांतीच कार्ट चालू आहे, वेगळ व्हायचंय मला, कन्याही सासुरासी जाये, उंबरठ्यावरी माप ठेविले, फुलाला सुगंध मातीचा, अधांतर, एक्सपायरी डेट, तो एक अरुणास्त, या नाटकांचेही अनेक प्रयोग झाले. रक्षिता यांनी एका वर्षात 48 नाटकातून भूमिका केल्या त्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेतील नऊ नाटकांचा समावेश आहे.
रंगभूमीवरील पदार्पणात अजित पाटील सारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करावयास मिळाले, त्यानंतर गुळवणीसर, दशरथ रांगणकर, श्रीकांत पाटील, यांच्याही दिग्दर्शनाचा तिला फायदा झाला.
गेल्या काही वर्षात राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक मिळवणे मानाचे समजले जाते… रक्षिताही त्यात मागे नाही.. नव्हती, मेला तो शेवटचा, मावळतीचा इंद्रधनु, वाटेला सोबत हवी, या तिन्ही नाटकांमध्ये भूमिका करून रक्षिताने उत्कृष्ट अभिनयाचे प्रमाणपत्र पटकावले, तसेच कामगार कल्याण केंद्र विक्रोळी येथे संकल्प कला मंच तर्फे सादर झालेल्या नाटकात उत्कृष्ट अभिनेत्रीचे तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेतील चांदणे शिंपीत जा, या नाटकातील भूमिकेसाठी सुद्धा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तिला मिळाले.
” एक गाव भुताचा” या दूरदर्शनच्या मालिकेमध्ये तसेच झी मराठीवरील एक मालिका, चार शॉर्ट फिल्म मध्ये तिने भूमिका केली होती.
रक्षिताने आत्तापर्यंतच्या या प्रवासात १४००पेक्षा जास्त नाट्यप्रयोगातून भूमिका केलेल्या आहेत.
… विशेष म्हणजे सावरकर नाट्यगृहातील स्पर्धेचा नाट्य प्रयोग संपल्यानंतर लगेच रक्षिता गावातल्या नाटकाच्या प्रयो गासाठी वेळेवर पोहोचली, असेही एकमेव उदाहरण सांगता येईल, तसेच ऐनवेळी नाटकात काम करण्याचे धाडस तिने दोन वेळा केलेले आहे, अशी ही हरहुन्नरी कलाकार आजही पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना नाटकातून काम करीत आहे. तिच्या या प्रवासाला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो.
शब्दांकन – श्रीकांत पाटील
संकलन – दीपक मांडवकर