Monday, September 15, 2025
घरमहाराष्ट्रसर्वसामान्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष अनुभवायास हवा..आयुष्य त्याला उमगावे..! अभियंता दिनविशेष

सर्वसामान्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष अनुभवायास हवा..आयुष्य त्याला उमगावे..! अभियंता दिनविशेष

रत्नागिरी(प्रशांत तवसाळकर ) : त्याला आयुष्य समजायला हवे. लोक नोकरी आणि पैशासाठी कसा सघर्ष करतात ते. अनुभवाशिवाय कोणतेही विद्यापीठ तुम्हाला हे जीवन कौशल्य शिकवू शकत नाही. आपल्या मुलाला चांदीच्या चमच्याने बनलेल्या खास जीवन पद्धतीतून बाजूला करून सर्वसामान्याच्या पातळीवरचा तो जीवनानुभव मिळण्यासाठी हजार कामगारांना जे अन्न कंपनीच्या भटारखान्यातून दिले जाते तिथेच जेवण आणि कंपनीत नोकरीसाठी निकष नि मुलाखत यात तावून सुलाखून संधी देत एका मराठमोठ्या अब्जाधिश उद्योगपतीने घेतलेल्या निर्णयातून उच्चतम संस्कार संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.

यशाची त्रिसूत्री
गत अडीच दशकात ज्यांनी 350 हून अधिक कारखान्यांची उभारणी केली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान अशा राज्यातून त्यांच्या स्कॉन प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीने काम केले आहे. सुरूवातीला कंपनीकडे भाग भांडवल नव्हते, नवीन काम मिळविणे आव्हानात्मक होते. अशावेळी काही काळ त्यांनी उद्योगांना सेवा पुरविण्यावर त्यांनी भर दिला. याच दरम्यान, खोपोली येथील कोरस इंटरनॅशनल या कंपनीचे तीन कोटीचे काम मिळाले. त्यानंतर सुरू झालेली घोडदौड अविरत सुरू आहे. देशासह विदेशातही त्यांनी अनेक कंपन्यांना औद्योगिक इमारत उभारणी करून दिली आहे. ही वाटचाल सोप्पी नव्हती. बांधकाम अभियंता म्हणून शिक्षण घेतल्यावर अनुभव हवा म्हणून त्यांनी ७०० रूपयांच्या मासिक पगारावर नोकरी पत्करली. त्या बांधकाम कंपनीत त्यांनी संचालकपद पर्यंत मजल मारली. यानंतर ती नोकरी सोडून भाडेतत्वावरिल गाळ्यात तीन माणसांच्या साथीने स्वतःची कंपनी सुरू केली, ज्याचे आज दहा मजली कॉर्पोरेट इमारतीतून काम चालते. क् वॉलिटी, सेफ्टी, स्पीड या त्रिसूत्रीच्या जोडीने गुणवत्ता व विश्वास त्यांनी जपला आहे. मॅक्झीमम रिस्क.. बिगेस्ट सक्सेस या धोरणात स्कॉनने आजचे हे भव्यदिव्य यश सामावले आहे.

ते विलक्षण चित्र..
शीतपेय बनविणाऱ्या कंपनीच्या इमारत उभारणी कामाची अनौपचारिक पाहणीवेळी प्रस्तृत प्रतिनिधीला ते चित्र दिसले. सर्वसामान्य कामगारांसोबत काम करणारा एक तरूण प्रकल्पस्थळी आलेल्या विदेशी अधिकाऱ्यांसोबत आंग्ल भाषेत संवाद साधतो. त्यांच्या शंकाचे यथायोग्य समाधान करतो. यानंतर परत मूळ कामाकडे वळत त्याच कामगारातला एक होऊन जातो. प्रकल्पस्थळी कंपनीचे हितचिंतक म्हणून काम पाहणारे अजितशेठ साळवी यांनी सांगितले की, चव्हाणसाहेबांचे हे चिरंजीव निनाद. स्वतः च्या मुलासाठी त्यांनी कोणतीही वेगळी व्यवस्था ठेवलेली नाही. अब्जाधिश उद्योगपतीचा अभियंता असलेला व उच्च शिक्षण विदेशात घेता झालेला मुलगा सर्वसामान्यांसारखे जीवन जगतो, हे सारे चित्रच विलक्षण होतं. या पार्श्वभूमीवर स्कॉन चे संस्थापक निलेशजी चव्हाण यांच्याजवळ संवाद साधला. ज्यातून उलघडली संस्कार संस्कृतीची कहाणी..

विनासायास काही नाही
सर्वसामान्य माणूस जीवन जगतांना कसा संघर्ष करतो हे कळायला हवे हे उद्गगार आहेत, स्कॉन कंपनीचे संस्थापक निलेश चव्हाण या मराठमोठ्या उद्योगपतीचे. राज्य आणि देशाच्या विविध भागात विशेषतः औद्योगिक क्षेत्रात त्यांचे काम विशेष उल्लेखनीय मानले जाते. संघर्ष, परिश्रम या जोडीने या जगात विनासायास असं काही नसतं, हे मुलांना कळायला हवं. मुलगा असो वा कुणीही. स्कॉनमध्ये प्रवेश हा नियमाप्रमाणे त्या प्रक्रीयेतूनच मिळेल. मुलांच्या बाबतीत तर काठीण्य पातळी मोठी ठेवण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने हे त्यांचे गाव.

कोणतंही काम छोटं नसतं
हे सारं आजचं वातावरण नाही. मला दोन मुलं. मोठा निनाद व निहार. मुलांच्या कुठल्याही मागणीवेळी त्यांना एक टास्क दिला जातो. एक छोटसं उदाहरण सांगतो, दहा- बारा वर्षाचे असतांना मुलांना खेळण्यातली गाडी मागितली. तेंव्हा आम्हीं पुण्यातल्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो. दिवाळी होती. फटाके फोडण्यात आल्याने कागदाचे कपटे सर्वत्र पसरले होते. मुलांना म्हटलं, तुम्ही उद्या सकाळी इमारत परिसर झाडून स्वच्छ करायचा. ते झाल्यावर घरातील प्रसाधनगृहाची स्वच्छता करायची. दुसऱ्या दिवशी सुरक्षा कर्मचारी चक्रावले. चव्हाणसाहेबांची मुले झाडू घेऊन काम करताहेत. सगळी सोसायटी हे काम पाहू लागले. कुठलंही काम छोटं वा हलक्या क्षेणीतलं नसत, आणि श्रमसंस्कार हे होणं गरजेचच असतं.

हॉटेल ते स्टेडियम नोकरी
निनादने सिव्हिल इंजिनिअर ही पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी इंग्लडला गेला. तेंव्हादेखील शिक्षणापुरते पैसे दिले. निनाद म्हणतो, जिथे राहत होतो तेथून आठ किलोमीटर अंतरावरून दुध, भाजी, चिकन आणायला जावे लागायचे. टॅक्सीला पैसे मोजण्यापेक्षा मी तेवढे अंतर चालत-धावत जायचो. व्यायामही व्हायचा आणि बचत देखील. त्या देशात हॉटेलमध्ये नोकरी केली. मग लक्षात आलं की, स्टेडियमवर रब्बी, फुटबॉलच्या मॅचेस व्हायच्या. तिथे पडेल ते काम केलं. एका तासाला १० पौंड मिळायचे. शिक्षणासाठी देखील एकटा विदेशात गेलो. यामुळे राहणं, शिक्षण संस्था या साऱ्या बाबतीत स्वतः निवड करून काम करावं लागलं. कधी कधी वाटायचं हे असं का? सारं काही असताना हे कष्ट प्रत जीवन वाटायला कशासाठी? तारुण्याच्या आक्रमक वृत्तीमुळे सुरुवातीला चिडचिड व्हायची राग यायचा. पण नंतर त्यामागचं वडिलांच धोरण लक्षात यायचं. संघर्ष, कष्ट आणि आत्मनिर्भरता हे बाळकडू त्यामागे होतं. ते तरूणाईत कडू वाटतं. पण, गरजेचच असतं. माणूस पैशातून नव्हेतर त्या अनुभवातून घडतो.

वेळ किंमत-अमूल्य
लोटे औद्योगिक क्षेत्रात कोका कोला या जगविख्यात कंपनीच्या इमारत उभारणीच्या कामासाठी टाटा, एलएनटी, शापूरजी पालनजी व आमची स्कॉन अशा कंपन्या स्पर्धेत होत्या. अशा दिग्गज कंपन्या असतांना या कामाचा ठेका स्कॉनला मिळाला. एवढंच नव्हेतर विहीत मुदती आधीच दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण केलं. जगभरातल्या त्यांच्या यापूवच्या अनुभवापेक्षा हे काहीतरी विलक्षण असल्याची भावना कंपनी अधिकारी व्यक्त करतात, यातच सारं आलं. स्कॉन संस्थापक श्री. चव्हाण सांगतात, देश-विदेशातून प्रवास करून रात्री अपरात्री वा पहाटे आलो तरी गेल्या ३२ वर्षात माझी कामावर येण्याची सकाळची साडेआठची वेळ चुकलेली नाही. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि वेळेच्या किंमतीचं मोल नाही, हेच मला यातून सांगायचंय. आजही कनिष्ठ अभियंता असल्याने व्हिजिटिंग कार्ड ठेवण्याचा अधिकार नाही. हे ऐकायला कसतरी वाटतं. पण, कंपनीचा नियम सगळ्यांना सारखा हेच सूत्र त्यामागे दडल आहे.

आम्ही कष्टानं कमवू.. !
दोन मुलं व पत्नी सौ. नंदिनी यांच्या नावे एक स्मार्ट अर्थ गुंतवणूक करून ठेवली आहे. अट एकच भविष्यात यातील पन्नास टक्के रक्कम ही कंपनीत गुंतवायची. १० हजार लोक कंपनीसाठी काम करतात. त्यांच्या घराची चूल सुख समाधानाने पेटायला हवी. हे त्यामागे भविष्यातलं धोरण. जे पेरालं ते उगवेल..या उक्तीप्रमाणे मुलांच उत्तर अधिक आनंद नि समाधान देऊन गेलं. ते म्हणाले, बाबा तुम्ही जी ठेव सुरक्षित ठेवलीय ती भविष्यात पन्नास नव्हेतर शंभर टक्के कंपनीतच गुंतवू, आम्हांला जे हवं ते तुमच्याप्रमाणं कष्टानं कमवू. बस्स. मुलांचे हे आत्मविश्वासपूर्वक स्वाभिमानी उत्तर म्हणजे स्कॉनचे भविष्य आणि भवितव्य हे दैदिप्यमान असल्याचे सांगायला कुणा भविष्य वेत्त्याची गरज नाही. एखाद्या बापाला यापेक्षा मोठं काय हवं असतंय…

पालकच बिघडवतात?
एका मराठी उद्योजकाची कहाणी यासाठीच की, मोठी माणसे पैशाने मोठी असतात असे नव्हे. तर ती आधी विचाराने श्रीमंत असतात मग ती कर्तुत्त्वाने मोठी होतात. कलियुगात तुमच्या मुलांना बिघडवण्यासाठी शेजाऱ्यांची मुलं येणार नाहीत. तर पालकच अतिलाडानं आपल्या मुलांना बिघडवतील हा महाभारतातला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. अशावेळी आपल्या बापाकडं संपत्ती असतांना असतांना सर्वसामान्यातलं सर्वसामान्य होऊन राहणं हा वडिलकीचा आदेश शिरसावंद्य मानणाऱ्या नव्या पिढीतील अशा काही शिलेदारांच म्हणूनच विशेष कौतुक. जिथे टाकली तिथेच चुकली आयुष्याची उडी..वाहतो ही दुर्वांची जुडी…हे त्या नाटकातलं वाक्य. आपल्या मुलांची आयुष्याची उडी चुकू नये म्हणून महत्त्वपूर्ण ठरावी.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments