कराड(प्रताप भणगे) : आज श्री निनाई देवी विद्यालय येथे वनविभाग सातारा आणि वनपरिक्षेत्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने बिबट्या व इतर वन्यप्राणी याविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास वनपाल डी. बी. कांबळे, वनरक्षक संतोष पाटील, वनरक्षक चिवटे साहेब, वनसेवक हनुमंत कोळी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक आनंदराव जानुगडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी वनपाल डी. बी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना बिबट्या प्राण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. “बिबट्या हा मांजर जातीतील असून तो शक्यतो माणसावर हल्ला करत नाही. मात्र, त्याला भक्ष वाटल्यास किंवा धोका जाणवल्यास तो हल्ला करू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वनरक्षक संतोष पाटील यांनी बिबट्याच्या आहाराविषयी माहिती देताना सांगितले की, “खेकडे, ससे, कुत्रे, शेळ्या यांसारखे छोटे प्राणी हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. जंगल कमी होत असल्याने तो गावाच्या आसपास फिरताना दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकटे न जाणे, हातात काठी ठेवणे, रात्री बाहेर पडताना टॉर्च व मोबाईल जवळ ठेवणे आणि समूहाने जाणे गरजेचे आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “बोलत राहिल्यास बिबट्या दूर जाईल. तसेच जंगल वाचवण्याची जबाबदारी आपली असून डोंगरात वनवा न लावता झाडे जगवावी. त्यामुळे जंगल निर्माण होईल आणि हे प्राणी मानवी वस्तीपासून दूर राहतील.”
कार्यक्रमाच्या शेवटी वैभव जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण होऊन जंगल आणि पर्यावरण संरक्षणासाठी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल.