कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या “महादेवी” हत्तीणीला नांदणी मठाकडे परत आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या जनभावनेचा आवाज बुलंद करत २ लाख ४ हजार ४२१ भक्तांनी स्वाक्षरी केलेले फॉर्म आज नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते विधीवत पूजन करून राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.
या पूजन सोहळ्याला आमदार ऋतुराज पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक शेखर पाटील, नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, तसेच राहुल खंजिरे, शशिकांत खोत, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सदर स्वाक्षरी फॉर्म रमणमळा पोस्ट ऑफिस, कोल्हापूर येथून थेट राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे पाठवण्यात आले असून महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याची कळकळीची मागणी केली जाणार आहे.