कास(अजित जगताप) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या सातारा तालुक्यातील निसर्गरम्य कास पठारावरील फुलांचा हंगाम तोंडावर आला आहे. कास रस्त्यावरील खड्डे तसेच साइड पट्ट्या खराब झाल्या होत्या. पर्यटकांना त्रास होऊ लागला . अशा वेळी बांधकाम व वन विभागाकडे निधी नसल्याने अखेर कास पठार व्यवस्थापन समितीने धोरणात्मक निर्णय घेतला. त्याचा पर्यटकांना फायदा झाला आहे.
देशी विदेशी पर्यटकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कास तलावाची उंची वाढविल्याने पूर्वीचा कास पठारावरून कास तलाव मार्गे बामणोली कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे पठारावरील रस्ता बंद झाला .बामणोली तसेच कास गावात जाण्यासाठी पूर्वीचा छोटा असलेला घाटाई देवी मंदिर मार्गे रस्ता दर्जोन्नत करून मोठा करण्यात आला. परंतु ह्या रस्त्यामुळे अंतर वाढत असून वाळंजवाडी गावच्या हद्दीत वनविभागाच्या जागेतून रस्ता जात असल्याने तिथे डांबरीकरण होऊ शकले नाही.हा रस्ता गैरसोयीचा ठरला. बामणोली , तांबी, जुंगटी विभागातील लोकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला . कास गावातील लोकांनीही आपली जमीन रस्त्यासाठी देवू केली. त्यामुळे कास तलावाच्या पाण्यात बुडालेल्या रस्त्याच्या वरच्या बाजूला नवीन रस्ता काढण्यात आला आहे. या सर्व अडचणींमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन वर्षांपासून कास पठार ते तलावादरम्यानच्या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले. साइड पट्ट्या गळून पडल्या. पर्यटकांची संख्या खूप असल्याने लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.. याकडे लक्ष देऊन कास समितीने स्वनिधीतून रस्ता दुरुस्त केला.
त्यामुळे आता आपल्याच धडावर आपले डोके असावे. असे स्थानिकांनी सांगितली. या विधायक उपक्रमासाठी ज्ञानेश्वर आखाडे , प्रदीप कदम, दत्ता किर्दत , सोमनाथ जाधव आणि सहकारी मित्र यांनी विशेष प्रयत्न केले.
कास पठार म्हणजे येथील भूमिपुत्रासाठी रोजगार देणारी नैसर्गिक योजना आहे. त्यामुळे कास पठार व्यवस्थापन समितीने रस्ता दुरुस्त केल्याबद्दल मुंबई येथील पर्यटक श्री आनंद फणसे, डॉ अरुण माने, श्याम रोकडे, यांच्या सह कुटुंबानी धन्यवाद दिले आहेत.
फोटो – कास ते कास पठार , कुमुदिनी तलावा दरम्यान रस्ता दुरुस्त काम (छाया – निनाद जगताप, सातारा)