प्रतिनिधी : जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे लिखित ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या पुस्तकाचे प्रकाशन राजधानी दिल्ली येथे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, माजी मुख्यमंत्री व जनता दल (सेक्युलर) कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्ताने साजरा करण्यात आलेल्या *‘अमृत महोत्सवा’*चे औचित्य साधून, गेल्या साडेसात दशकांत भारताच्या प्रगतीचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकात सामाजिक, आर्थिक, कृषी, शैक्षणिक, औद्योगिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, धोरणे आणि घटना यांचा चिकित्सक अभ्यास मांडण्यात आला आहे.
लेखक नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले की, “या पुस्तकातून भारताच्या विकासयात्रेतील दिशादर्शक व मार्गदर्शक घटकांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक समाजाच्या विविध स्तरांतील वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, याबाबत मला पूर्ण खात्री आहे.”
या प्रकाशनप्रसंगी मा. कुमारस्वामी यांनी नाथाभाऊ शेवाळे यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास जनता दल महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष संग्रामसिंह शेवाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.