मुंबई : संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित असा संसदरत्न पुरस्कार २०२५ हा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदार संघाच्या खासदार वर्षा एकनाथराव गायकवाड यांना देऊन सन्मानीत करण्यात आले. नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमात संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ही माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे, हा पुरस्कार मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघासह माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. मुंबईकरांनी ज्या विश्वासाने मला लोकसभेवर निवडून पाठवले, त्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन. जनतेचे प्रेम, आपुलकी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळेच हा बहुमान मला मिळाला आहे. हा सन्मान मी मुंबईच्या जनतेला अर्पण करते. हा सन्मान जनतेची आणि माझ्या पक्षाची भूमिका लोकसभेत अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी मला प्रेरणा देईल, असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.