ताज्या बातम्या

स्मशानभूमीतही कंत्राटदाराची मनमानी, मृतदेह घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय;पालिका अधिकाऱ्यांचे कान डोळे बंद…

प्रतिनिधी(रमेश औताडे) : मरणानंतरही संकटांचा सामना करावा लागत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी नेमके करतात तरी काय ? असा सवाल स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन येणारे नागरिक करत आहेत.

पालिका स्थापन होण्याअगोदरची जुनी असणारी घणसोली सेक्टर ८ येथील (कौलआळी) स्मशानभूमीची विविध समस्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. मृतदेह जळीत केल्यानंतर राख स्मशानाच्या आवारातच टाकून दिली जात आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीचा वास सहन करावा लागत आहे.

पालिकेने स्मशानभूमी व्हिजन अंतर्गत शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने सुशोभीकरणाच्या नावाखाली तात्पुरती डागडुजी करून रंगरंगोटी करत करोडो रुपयांचा मनमानी कारभार केला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दरमहा सरासरी २० ते २५ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानाच्या आवारात संरक्षण भिंतीलगत आरसीसी पीसीसी (प्लीथ) किंवा पेव्हर ब्लॉक लावण्यात न आल्याने उंदीर, घुशींचा तसेच सापांचा वावर आहे.

अनेक ठिकाणी कचरा जागीच जाळला जात असल्याने घाणीच्या साम्राज्यात येथील अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना नाक-तोंड दाबून यावे लागत असल्याची शोकांतिका आहे.त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरीक संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top