कराड : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 169 व्या जयंती निमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा सोमवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय विद्यानगर, कराड येथे आयोजित केला आहे. या पुरस्कार सोहळयात संदीप डाकवे यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र शासनाचे 6 पुरस्कार मिळाले आहेत. तसेच डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, द ग्रेटेस्ट इंडियन या पुस्तकात झाली आहे
संदीप डाकवे यांनी पत्रकारितेसोबत 70 च्यावरती विविध पुस्तके, मासिके, दिवाळी अंक, नियतकालिके, अहवाल, स्मरणिका इ.ची कल्पक मुखपृष्ठे साकारली आहेत. डाकवे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना गरजूंना रोख आर्थिक मदत केली आहे.
गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी असलेल्या कराड येथे होत असलेल्या पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी केले आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या पत्रकार संदीप डाकवे यांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




