प्रतिनिधी : घाटकोपर येथील खंडोबा टेकडीवर गेले दोन दिवस जेसीबी मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल सुरू आहे. या भागातील हजारो झाडांची छाटणी किंवा तोड करण्यात आली असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे.
या कारवाईविषयी प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. काम करणाऱ्यांकडून हे “एअरफोर्सचे काम” असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, हिरानंदानी समूहाच्या बाउन्सरकडून स्थानिक नागरिकांना हटवले जात आहे, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नागरिकांचा संशय आहे की, या जागेवर भविष्यात रॉ हाऊस, इमारती किंवा हॉटेल्स उभारली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेकडीवरील जंगल नष्ट होईल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेल.
पर्यावरणप्रेमी पत्रकार प्रशांत बढे यांनी या बाबत आवाज उठवला आहे. त्यांनी प्रशासनाकडे याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे जंगल अत्यंत महत्त्वाचे असून, मुंबईसारख्या शहरातील हवा आणि तापमान नियंत्रणासाठी टेकडीवरील हिरवळ उपयुक्त ठरते.
या परिस्थितीत प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित परवानग्यांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.