मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कर्मचारी सौ. स्नेहल मसूरकर १० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक सोहळ्यात मसूरकर यांच्याबाबत विविध मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणींमुळे पत्रकार संघाच्या वैभवशाली आठवणींना उजाळा मिळाला.
स्नेहल मसूरकर यांनी आपल्या १० वर्षांत पत्रकार संघाच्याप्रती कर्तव्य तर पार पाडलेच, पण त्यांच्या पत्रकार संघावरील निष्ठेमुळेच आज त्यांना निरोप देण्यासाठी पत्रकार क्षेत्रातील दिग्गज संपादक, पत्रकार, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पत्रकार संघाच्या कार्यकारिणी आणि विश्वस्तांतर्फे
१५ हजार रुपयांचा गौरव निधी स्नेहल मसूरकर यांना प्रदान करण्यात आला.
स्नेहल मसूरकर या आपल्या कामाच्या प्रती किती प्रामाणिक आहेत, हेच आम्हाला पाहायला मिळाले. त्यामुळे स्नेहल मसूरकर जरी निवृत्त झाल्या असल्या तरी त्या पत्रकार संघाच्या कामात यापुढेही कार्यरत राहतील, असा निर्णय कार्यकारिणीने घेतला, असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दिमाखात ज्या काही मोजक्या संघटना कार्यरत आहेत त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाचा नंबर खूपच वरचा आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने जो माझा कौतुक सोहळा आयोजित केला आहे, त्यासाठी अध्यक्ष संदीप चव्हाण आणि त्यांच्या कार्यकारिणीचे ऋण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. पत्रकार संघाची एक महिला कर्मचारी म्हणून मला नेहमी मान, आदर, सन्मान, आपुलकी मिळाली, असे स्नेहल मसूरकर आपल्या भाषणात म्हणाल्या.
मसूरकर यांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, माजी अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, दीपक म्हात्रे, विजय तारी, प्रदीप कोचरेकर, सदानंद खोपकर, सदस्य राजेश माळकर, राजेंद्र साळसकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.