ताज्या बातम्या

हुश्श…झाली….एकदा काळगांव परिसरात धुळवाफेवरील पेरणीला सुरुवात

तळमावले(संदीप डाकवे) : मे महिन्यातील 20 तारखेपासून अगदी काल परवापर्यंत अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून टाकली. त्यामुळे बळीराजाला मे महिन्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला अजिबात वेळ मिळाला नाही. दोन तीन दिवसापूर्वी पाऊस उघडल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतला आहे. रविवार दि.8 जून पासून मृग नक्षत्र सुरु झाल्याने शेतकरी वर्ग चिंतीत होता. परंतू पावसाने उघडीप दिल्याने काळगांव विभागात सध्या धुळवाफेवरील पेरणीची लगबग सुरु असलेली दिसून येत आहे. त्यामुळे शेतशिवार अगदी माणसांनी गजबजून गेला आहे. शेतामध्ये खते टाकणे, शेतीतील पालापाचोळा गोळा करणे, बांध धरणे, घरात लाकडे भरणे, वैरण घरात भरणे इ. सर्व कामे यावेळी रखडली होती. ती हातघाईवर आली आहे. एरवी उन्हाळयातच धूळवाफेवरील पेरणी केली जाते. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, मका इ.पीके घेतली जातात. परंतू यावेळी धूळवाफेवरील पेरणी झाली नाही. दोन दिवसापूर्वी या परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे लोकांनी पेरणीची कामे युध्दपातळीवर सुरु केली आहेत.
नांगर, कुळव, पाटे, कुरी, बांडगे इ. पारंपारिक शेती औजारांच्या सहाय्याने लोक शेती करत आहेत. क्वचितच रोटर, ट्रॅक्टर सारख्या औजारांचा वापर करत आहेत. बहुतांषी गावात कमी बैलजोडया आहेत. त्यामुळे लोकांची पेरणी करत असलेल्या बैल मालकांकडून आपली शेती प्रथम पेरुन घेण्याची गडबड सुरु आहे.
पेरणीमुळे सर्व लोक शेतामध्ये दिसत आहे. सर्व शिवार माणसांनी फुलून गेला आहे. काळगांव विभागातील डाकेवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, करपेवाडी, मस्करवाडी, चोरगेवाडी, वेताळ, निवी, सलतेवाडी, मत्रेवाडी इ.वाडया वस्त्यांवर सध्या धुळवाफेवरील पेरणीची तसेच शेतीच्या मशागतीची लगीनघाई सुरु असल्याचे दिसून येत आहे.

चौकटीत :
सध्या शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पेरणीच्या व शेतीच्या कामात एकमेकांना सहकार्य करण्याची भावना अजूनही लोकांच्या मध्ये आहे. एका मालकाच्या शेताच्या बाजूला दुसऱ्या मालकाची असलेली शेती एकाच औताच्या साहय्याने करण्यास लोक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये एकोप्याची भावना अजूनही कायम असल्याचे दिसते.
या श्री.भरत डाकवे, शेतकरी

फोटो कॅप्शन : डाकेवाडी (काळगांव) येथे पेरणी करत असताना शेतकरी बांधव

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top