Wednesday, June 18, 2025
घरमहाराष्ट्रपत्रकारांचे सडेतोड मत : आजची परिस्थिती अघोषित आणिबाणीच्या जवळ - जतीन देसाई

पत्रकारांचे सडेतोड मत : आजची परिस्थिती अघोषित आणिबाणीच्या जवळ – जतीन देसाई

नवेल(सदानंद खोपकर) : “आज जवळजवळ अघोषित आणिबाणी आहे. पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना कठोर प्रश्न विचारले पाहिजेत, हीच त्यांची खरी भूमिका आहे,” असे स्पष्ट आणि सडेतोड मत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी व्यक्त केले.

दैनिक लोकांकीतच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय नवरत्न पत्रकार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ऑल जर्नालिस्ट अ‍ॅण्ड फ्रेंड्स सर्कलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष निमंत्रित म्हणून समाजसेवक नानजीभाई ठक्कर उपस्थित होते.

जतीन देसाई म्हणाले, “मागील चार वर्षांपासून मी बातम्या पाहणे बंद केले आहे. माध्यमांवरील जनतेचा विश्वास ढासळलेला आहे. काही वाहिन्यांवरील पत्रकारांना नागरिकांनी थेट हाकलून लावल्याचे आपण पाहिले आहे. पत्रकारांनी जनतेचा विश्वास पुन्हा मिळवला पाहिजे.”

त्यांनी आणखी उदाहरण देताना सांगितले की, “आपल्या काळात रामनाथ गोयंका यांच्या नेतृत्वाखाली इंडियन एक्स्प्रेसने आणीबाणीविरोधात ठाम भूमिका घेतली होती. सत्ताधाऱ्यांच्या रागात येणारा पत्रकार हा चांगला पत्रकार समजावा.”

भूतकाळातील पत्रकारांच्या संघर्षांची आठवण करून देताना, त्यांनी ब्रिटीश काळातील व्हाइसरॉय वॉरन हेस्टींग्ज यांच्या ‘द बेंगाल गॅझेट’विरोधातील कारवाया, तसेच क्रांतिकारक भगतसिंग यांचे लेख प्रकाशित करणारे संपादक गणेश विद्यार्थी यांचा उल्लेख केला.

देसाई यांनी सध्याच्या डिजिटल माध्यमांवरील ट्यूब चॅनल्सविषयीही भाष्य करत सांगितले की, “परखड मते मांडणाऱ्या चॅनल्सवर सरकार मर्यादा आणण्याचा प्रयत्न करू शकते.”

दैनिक लोकांकीतचे संपादक संजय पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून वर्धापनदिनाचे औचित्य सांगितले. या वेळी वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात दै. पुण्यनगरीचे संपादक शैलेन्द्र शिर्के यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वैभव पाटील (दै. पुढारी, कराड) यांच्यासह अनेक पत्रकारांना नवरत्न पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले.

याशिवाय, दहावीतील यशस्वी विद्यार्थी, शासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, आणि समाजकार्य करणाऱ्या महिलांचा देखील यथोचित गौरव करण्यात आला. कायदेविषयक सल्लागार ॲड. स्मिता चिपळूणकर यांनाही सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम पत्रकारितेतील जबाबदाऱ्या, स्वातंत्र्य आणि जनतेशी असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments