राजापूर(रमेश तांबे) : राजापूर तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या निखरे गावात भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांची संयुक्त जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध उत्कृष्ट मंडळ कपिलवस्तू निखरे, जागृती महिला मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकवाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी गावचे सरपंच, पोलीस पाटील तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
रात्री दहा वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रमात कव्वालीचा रंगतदार सामना रंगला. या सामन्यात मुंबईचे प्रसिद्ध कवीगायक संदीप यादव यांच्यासमोर नागपूरच्या वैशाली किरण यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांच्यासोबत कवी कोकणरत्न जनीकुमार कांबळे व श्रीपत कुसुरकर यांनीही आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.
सर्व कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निखरे बौद्धवाडी, बौद्ध तरुण उत्कृष्ट मंडळ आणि कपिलवस्तू महिला मंडळ यांनी यासाठी पुढाकार घेतला.