नवी मुंबई : ग्रामीण भागातून आलेल्या कष्टाळू उद्योजकाने उद्योग आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दुर्गम वहागांव येथील हनुमंत बळवंत रांजणे हे आज रिझर्व्ह बँक मान्यताप्राप्त ‘उन्नती फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
बँकिंग क्षेत्रातील १६ वर्षांचा अनुभव आणि सूक्ष्म वित्तपुरवठ्याचे सखोल ज्ञान यांच्या आधारे त्यांनी २०११ साली उन्नती फिनसर्व्हची स्थापना केली. सध्या महाराष्ट्र व गुजरातमध्ये कंपनीच्या ६४ शाखा असून ५५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. दापवडी व करहर पंचक्रोशीतील अनेक तरुण-तरुणींना रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य उन्नतीने केले आहे.
महिला स्वावलंबनावर भर देत उन्नती फिनसर्व्हमार्फत भाजीपाला विक्री, खाद्यपदार्थ व्यवसाय, लघुउद्योग करणाऱ्या महिलांच्या गटांना कर्जपुरवठा केला जातो. आतापर्यंत एक लाखांहून अधिक महिलांना कर्ज देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले असून एनपीएचे प्रमाण शून्य आहे. कोरोनाकाळातही स्वयंरोजगारासाठी महिलांना मदत करून कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली.
उद्योग व सामाजिक क्षेत्रातील या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘धगधगती मुंबई’ वृत्तपत्राच्या वर्धापनदिनानिमित्त हनुमंत रांजणे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.




