
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एम-पश्चिम विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या गटाई कामगारांना महापालिकेच्या वतीने बाकडा काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. या कारवाईमुळे कामगारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. याबाबत संबंधित गटाई कामगारांनी राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार श्री. बाबुराव माने यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर श्री. बाबुराव माने, प्रदेश कार्याध्यक्ष श्री. राजेश खाडे, समाजनेते श्री. सुनील कांबळे, ढमढेरे यांच्यासह इतर समाजबांधवांनी एम-पश्चिम वॉर्डचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली. या भेटीत गटाई कामगारांच्या अडचणी, उपजीविकेचे प्रश्न व सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर सहाय्यक आयुक्तांनी सदर जागेवर सध्या गटाई कामगार बसल्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट करत कामगारांना तात्पुरता दिलासा दिला. मात्र, पुढील काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सहाय्यक आयुक्तांनी सांगितले की, नव्याने लागू झालेल्या न्यायालयीन आदेशानुसार रेल्वे स्टेशनपासून १५० मीटर परिसरातील फेरीवाले तसेच फुटपाथवरील अडथळा निर्माण करणाऱ्या संरचना हटवण्याचे आदेश सर्व महानगरपालिकांना देण्यात आले आहेत. तरीही प्रशासनामार्फत मार्ग काढून गटाई कामगारांना तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाबुराव माने यांनी आवाहन केले आहे की, कोणावरही अशा प्रकारचा अन्याय होत असल्यास त्यांनी तात्काळ राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी, मुंबई येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा.




