Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्र“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे...

“लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी विचारांची गरज” — दलित पँथर नेते कीर्ती ढोले यांचे वक्तव्य

मुंबई, प्रतिनिधी : सदिच्छा सामाजिक विकास संस्था च्या वर्धापन दिन व बुद्ध पौर्णिमाचे औचित्य साधत नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले दलित पँथरचे नेते कीर्ती ढोले यांचे प्रभावी व ज्वलंत भाषण

कीर्ती ढोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजासाठी काम करणाऱ्यांच्या कार्याची कृतज्ञतेने दखल घेतली पाहिजे. त्यांना बळ मिळाले पाहिजे. त्यांच्या चळवळीला ताकद मिळाली पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “आजच्या परिस्थितीत आपण लोकशाहीच्या गंभीर संकटातून जात आहोत. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ वैचारिक नाहीत, तर मानवतेचा मार्ग दाखवणारे आहेत. माणसं जगवणं हे त्यांचं ध्येय होतं, मारणं नाही.”

भारतातील लोकशाहीवर होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधत, ढोले म्हणाले, “नेत्यांना बदनाम करण्याचे कट रचले जात आहेत. हे थांबवायचे असेल, तर आंबेडकरी विचारांशी निष्ठा ठेवत प्रश्न विचारण्याचे आणि चुकीला विरोध करण्याचे धैर्य आपल्यात पाहिजे.”

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रबोधन आजही गरजेचे आहे. बाबासाहेबांनी सर्वांचे प्रबोधन केले, आता त्यांचे अनुयायी पुढे येणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी कीर्ती ढोले यांनी सदिच्छा सामाजिक संस्थेला मनापासून शुभेच्छा दिल्या व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात आयु. तजीलाबाई खैरमोडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समाजहितासाठीच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी इतर मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी राजेंद्र नायकर, ए. रविचंद्रन (समाज गौरव पुरस्कार), मनोहर मोरे (समाज भूषण पुरस्कार), राहुल भंडारे (कलावैभव पुरस्कार), आणि पल्लवी जाधव व चैतन्य जावळे (धम्म प्रेरणा पुरस्कार) यांनाही गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनील कांबळे ,सचिव शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी केले होते. सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वी केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments