मुंबई(रमेश औताडे) : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे माहेरघर बनली असून शहराच्या विकासकामांच्या नावाखाली लाखो कोटींचा गैरव्यवहार सुरू आहे. असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) मुंबईच्या सहा तालुक्यांमध्ये भांडाफोड आंदोलन करणार असल्याचा इशारा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी दिला आहे.
मान्सून साफसफाई अंतर्गत झालेला भ्रष्टाचार, पालिकेच्या ठेवीवर मारलेला डल्ला, सिमेंट काँक्रीकरण रस्ते भ्रष्टाचार, रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी व मुंबईकरांना होणारा त्रास, नगरसेवकांना पाच कोटीचा निधी देऊन पक्ष फोडा फोडी प्रकरण,आदी विविध मुद्द्यावर हे भांडा फोड आंदोलन करण्यात येणार आहे.
सर्व आर्थिक घोटाळ्यांची माहिती जनतेसमोर मांडण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांची जबाबदारी ठरवण्याची मागणी केली जाणार आहे. या आंदोलन मोहिम व जनजागृतीमुळे मुंबईकरांना त्यांच्या पैशाचा हिशोब मागण्याचा आवाज मिळणार आहे. दस्तऐवजांच्या आधारे हे आंदोलन राबवणार असून ही फक्त सुरुवात आहे असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी सांगितले.