मुंबई : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाला सावरण्यासाठी अखेर तिकीट दरात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर ८ मेपासून ही दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे.
नव्या दरांनुसार, सध्या ५ रुपयांना मिळणारे किमान बस तिकीट आता १० रुपये होणार आहे, तर वातानुकूलित बसचे किमान तिकीट ६ रुपयांऐवजी १२ रुपये लागणार आहे. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठीही झटका असून, दिवसभराचे तिकीट ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. मात्र, या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे — ५ ते १२ वयोगटातील मुलांना हाफ तिकीट पुन्हा लागू करण्यात आले आहे. दरवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरिटी’कडे सादर केला असून, त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर दोन-तीन दिवसांत नव्या दरांची अंमलबजावणी होईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दशकभरात बेस्टला ११ हजार कोटींचा आर्थिक आधार दिल्यानंतरही अडचणी कायम असल्याने अखेर महापालिकेने तिकीट दरवाढीला संमती दिली आहे. बेस्टच्या या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांवर भार वाढणार असला, तरी उपक्रमाची आर्थिक सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.