मुंबई – माळशेज घाट मार्गावर होणाऱ्या एसटी प्रवाशांच्या त्रासाला कंटाळून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील मुंबई-ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांनी आज थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. “पुरे झाली एसटीची मनमानी, आता ऐकायलाच हवं!” असा सूर उपस्थित प्रतिनिधींमध्ये होता.
पत्रकार नरेंद्र डुंबरे, लेखक संजय नलावडे, पत्रकार प्रशांत बढे, सामाजिक कार्यकर्ते किशोर डुंबरे, कवी संजय गवांदे आणि व्यावसायिक मयूर आवटे यांच्यासह एक प्रतिनिधी मंडळ सरनाईकांच्या दारात पोहोचलं आणि एसटीच्या सडलेल्या व्यवस्थेची पूर्ण उजळणी केली.
निकृष्ट हॉटेल्सवर थांबा का?
मुंबई किंवा कल्याणहून माळशेज घाट मार्गे प्रवास करणाऱ्या एसटी बस थांबतात त्या टोकावडे, सरळगाव, मोरोशी परिसरातील हॉटेल्समध्ये स्वच्छतेचा पार बोजवारा. “नाश्ता निकृष्ट, शौचालय विद्रूप, आणि महिला प्रवाशांची कुचंबणा!” — ही वस्तुस्थिती थेट मंत्र्यांसमोर मांडण्यात आली. योग्य दर्जा नसलेल्या हॉटेल्सवर थांबे रद्द करून दर्जेदार हॉटेल्सवर बस थांबाव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
प्रवाशांना मनमानीने उतारतात!
बसेस तिकीट काढलेल्या ठिकाणी सोडत नाहीत, वाहक आणि चालकांची मनमानी – घाटकोपरमधील ‘हुतात्मा बाबू गेनू सैद एसटी स्थानक’ाऐवजी पूर्व द्रुतगती मार्गावरच प्रवाशांना उतरवून टाकले जाते. “दोनशे रुपये रिक्षा खर्च आणि जीवाची चिंता – या त्रासाला काही अंत आहे का?” असा सवाल प्रतिनिधींनी केला. प्रत्येक बसमध्ये वरिष्ठांचे संपर्क क्रमांकही चिकटवावे, अशी ठणठणीत मागणी झाली.
बंद बससेवा पुन्हा सुरू करा!
पूर्वी धडधडणाऱ्या जुन्नरमार्गावरील अनेक एसटी मार्ग आता ठप्प आहेत. ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’सारख्या आरामदायक बसेस पुन्हा सुरू करण्याची मागणी करताना, “पर्यटकांची सोय झाली तर महसूलही वाढेल!” हे स्पष्ट करण्यात आलं. शिवनेरी किल्ला, नाणेघाट, भीमाशंकरसारख्या ठिकाणी प्रवासी वाढले तर एसटीलाच फायदा होईल, हे निदर्शनास आणून दिलं.
सर्वोदय स्थानकाला न्याय मिळणार का?
घाटकोपरच्या सर्वोदय एसटी स्थानकात आरक्षण केंद्र बंद – तातडीने सुरु करा! तसेच स्थानकाचं अधिकृत नाव ‘हुतात्मा बाबू गेनू सैद बस स्थानक’ करावं, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सरनाईकांचा आश्वासक प्रतिसाद
या सगळ्या मुद्द्यांचं निवेदन मंत्री सरनाईक यांना देण्यात आलं. त्यांनीही लगेच प्रतिसाद देत, “लवकरच बैठक घेऊन निर्णय होईल. अशा सूचना नागरिकांनी करत राहाव्यात, एसटी सुधारण्यासाठी तुमचा सहभाग महत्वाचा आहे,” असं स्पष्ट केलं.