सायगाव(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ परिसरातील तरुण तडफदार पोलीस पाटील सुहास भोसले- पाटील यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. असा बहुमान मिळवणारे सायगाव भागातील पहिले पोलीस पाटील ठरले आहेत.
राज्याचे पर्यटन व माजी सैनिक कल्याण निधी आणि गौण खनिज विभागाचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस पाटील सुहास भोसले यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपये देऊन त्यांच्या कुटुंबासमवेत गौरवण्यात आला.
महाराष्ट्र दिनी छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा शहर या ठिकाणी हा सोहळा पार पडला. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपाधीक्षक (गृह) सबनीस तसेच श्री भोसले कुटुंबीय यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते .
जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ पोलिस पाटील सुहास भोसले यांनी महसूल, पोलीस प्रशासन व सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी महिगाव, दुदुस्करवाडी, नरफदेव (मेरुलिंग) या गावांचा प्रभारी पोलीस पाटील म्हणून कारभार उत्कृष्टरित्या सांभाळला. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेले काम पोलिस पाटील यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. पोलिस व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम केले . महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सुहास भोसले यापूर्वीही सन्मानित झाले आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर यापूर्वीही २५ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या पुरस्काराबद्दल त्यांचे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, जावळीचे तहसीलदार हनुमंतराव कोळेकर, मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व हरिष पाटणे, मराठी साहित्य परिषद कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, दत्ता पवार, शहाजी गुजर, जीवनधर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिवणकर आदींनी अभिनंदन केले आहे.
______________________________
फोटो महाराष्ट्र दिनी खर्चीतर्फ कुडाळ पोलीस पाटील सुहास भोसले यांना पुरस्कार प्रदान करताना मान्यवर (छाया– अजित जगताप, सायगाव)