मीरा-भाईंदर : मुंबई शहराच्या वेशीवर वसलेल्या मीरा-भाईंदर शहरात हवाई टॅक्सी च्या माध्यमातून भविष्यातील अत्यंत सुलभ आणि किफायतशीर वाहतूक पर्यायाची सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेणे व सर्वेक्षण करण्याची परवानगी संबंधित संस्थेला मीरा -भाईंदर महापालिकेने दिली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली आहे. भविष्यात रस्ते वाहतूकीला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील कोंडी दूर करण्यासाठी हवाई टॅक्सी चा प्रयोग नक्कीच यशस्वी ठरेल. तसेच या डिसेंबर महिन्यामध्ये मीरा-भाईंदर शहर हे मेट्रोच्या मार्गीकेवर येणार असल्यामुळे मेट्रोला कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हवाई टॅक्सी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यांनी यावेळी केले.
उत्तन सारखा निसर्गरम्य सागरी परिसर, घोडबंदर किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, घोडबंदर खाडी किनाऱ्या लगत विकसित होत असलेले कांदळवन उद्यान असे अनेक नवीन पूर्ण प्रकल्प मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये होत असून हवाई टॅक्सी च्या माध्यमातून आणखी एका नव्या प्रकल्पाची त्यामध्ये भर पडत आहे.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथील वडोदरा येथे हवाई टॅक्सी चा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात मंत्री सरनाईक यांना निर्देश दिले होते. त्यानुसार त्यांनी गुजरात दौऱ्यावर या प्रकल्पाची पाहणी केली. त्या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी अशाच प्रकारचा प्रयोग ठाणे व मीरा -भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये करण्याबाबत पुढाकार घेतला. सध्या या प्रकल्पाला जे.पी. इन्फ्रास्ट्रक्चर समोरील जागा देण्यात आली असून शहरातील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे .असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रात लवकरच हवाई टॅक्सी सुरु होणार* — मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
RELATED ARTICLES