मुंबई : तब्बल ४२ वर्षे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला चालविणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांनी १४ सप्टेंबर २०२४ रोजी इहलोकीची यात्रा संपविली आणि यापुढे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला होणार की नाही असे वाटत असतांनाच विजय वैद्य यांनी घडविलेल्या धडपडणाऱ्या मुलांनी चक्क ४३ व्या वर्षीची जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला विजय वैद्य कुठेही गेलेले नाहीत ते प्रत्येकाच्या शरीरात वास करीत आहेत अशा भारलेल्या वातावरणात जीवनविद्या मिशन चे व्याख्याते शैलेश रेगे यांच्या मनाचे व्यवस्थापन या विषयावर पहिलेच दणदणीत व्याख्यान आयोजित केले. साऱ्यांची ह्रुदये हेलावली आणि याच ह्रुदय पिळवटून टाकणाऱ्या धीरगंभीर वातावरणात ज्येष्ठ सुसंवादिनी मंगलाताई खाडिलकर यांना शिवसेना उपनेते, माजी आमदार आणि या व्याख्यानमालेचे आधारस्तंभ विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते शारदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पहिलाच शब्द विजय वैद्य यांच्या लाडक्या भगिनी मंगलाताई खाडिलकर यांनी उच्चारला आणि साऱ्यांचे डोळे डबडबले, मानसपुत्र सचिन वगळ यांनी सूत्रसंचालन करण्यासाठी हाती ध्वनीक्षेपक घेतला तेंव्हा त्यांच्या ओठातून शब्द फुटत नव्हता. डोळ्यांच्या कडांनी आसवांना वाट मोकळी करुन दिली. मानसकन्या प्रा. सौ नयना रेगे या सद्गदित झाल्या होत्या. समस्त जय महाराष्ट्र नगर वासियांनी आपल्या लाडक्या वैद्यांची प्राणप्रिय जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु झाल्याचे पाहताच मनोभावे मानाचा मुजरा केला. सातत्याने ४५ वर्षे आपल्या सुमधुर वाणीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मंगलाताई खाडिलकर यांनी हा शारदा पुरस्कार माझ्या मोठ्या बंधुराजानेच मला दिला असल्याने अनेक पुरस्कार मिळाले असले तरी हा माझ्या माहेरचा पुरस्कार असल्याचे दाटून आलेल्या कंठाने सांगितले आणि भरगच्च गर्दीने फुलून गेलेल्या प्रांगणातील रसिक श्रोत्यांनी मंगलाताईंना उत्स्फूर्त दाद दिली. मंगलाताई खाडिलकर यांनी विनोद घोसाळकर यांच्यासह सर्वांनाच ही व्याख्यानमाला यापुढे अविरत सुरु राहणार असून वैशाली विजय वैद्य यांच्या रुपाने विजय वैद्य यांचे आशीर्वाद सदैव जसे पाठीशी आहेत तद्वतच आपण सर्वांनी या धडपडणाऱ्या मुलांच्या पाठीशी उभे रहा, असे भावपूर्ण आवाहन केले. विनोद घोसाळकर यांनी सुद्धा गेल्या ४२ वर्षे चाललेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतांनाच विजय वैद्य हे खऱ्या अर्थाने एन्सायक्लोपीडिया, चालता बोलता ज्ञानकोश होते, संदर्भ ग्रंथ होते,अशा शब्दांत विजय वैद्य यांच्या कार्याचा गौरव केला तसेच आज ४३ व्या वर्षी सुद्धा पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात रसिक प्रेक्षक जमले, हीच खरी आनंद आणि आश्चर्याची बाब आहे. आपण सदैव या वसंत व्याख्यानमालेच्या पाठीशी राहण्याचे अभिवचनही त्यांनी दिले. प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना सर्वांनी उभे राहून मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली. प्रथेप्रमाणे वैशाली विजय वैद्य, विनोद घोसाळकर, मंगलाताई खाडिलकर, शैलेश रेगे, हेमंत पाटकर आदींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन करण्यात आले. पसायदान आणि राष्ट्रगीत होऊन प्रथम दिनाची सांगता झाली.
वसंत व्याख्यानमाला सुरु झाली आणि साऱ्यांची ह्रुदये हेलावली ; भारलेल्या वातावरणात मंगलाताई खाडिलकर यांना शारदा पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES