मुंबई : मुंबईकरांचा तीव्र विरोध असूनही सरकारने बेस्ट बसचे भाडे जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ बेस्टच्या समस्या सोडवणार नाही तर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह असलेली सार्वजनिक वाहतूक सेवा गरीब व मध्यम वर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाईल. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसची भाडेवाढ अन्यायकारक असून मुंबईकरांसाठी चालणाऱ्या BEST बससाठी सरकारने तातडीने व पुरेसा निधी द्यावा व भाडेवाढ करू नये, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
बेस्ट बसच्या भाडेवाढीवर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बेस्टच्या समस्या वेट लीज खासगीकरणाच्या अपयशी मॉडेलमुळे निर्माण झाल्या आहेत, हे स्पष्ट असूनही सरकार ते रद्द करण्यास तयार नाही, कारण त्यांचा हेतूच बेस्टला संपवण्याचा आहे. आता तर बेस्टचे डेपो सरकार उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी देशातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाणारी बेस्ट, आज मुद्दाम दुर्बल केली जात आहे. बेस्टला केवळ फीडर सेवेत रूपांतरित करण्याचा डाव रचला जात आहे. याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे.
दररोज ३१ लाखांहून अधिक मुंबईकर बेस्टच्या बस सेवेवर अवलंबून आहेत, त्यात कामगार आणि मध्यमवर्गीयांचा मोठा वाटा आहे. बेस्टला सक्षम करण्याऐवजी ती योजनाबद्धरीत्या संपवली जात आहे. मुंबईला विश्वासार्ह, परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा हवी आहे आणि ती फक्त बेस्टद्वारेच शक्य आहे. त्यामुळे बेस्ट सक्षम करण्यासाठी वेट लीज खासगीकरणाचे मॉडेल तातडीने रद्द करावे, बेस्टचे डेपो खासगी विकासकांच्या घशात घालू नये, बेस्टच्या मालकीच्या बसेस वाढवा. सरकार जर मेट्रो प्रकल्पांसाठी आणि एक्सप्रेसवे प्रकल्पांसाठी हजारो कोटींची तरतूद करू शकते तर गरीब आणि मध्यमवर्गीय मुंबईकरांसाठी चालणाऱ्या बेस्टसाठी का तरतूद करत नाही? सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा आहे, नफ्याचा धंदा नाही, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.