कल्याण : सार्वजनिक वाचनालय, कल्याण आणि स्वामीराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळजळीत व विचारप्रवर्तक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “साहित्यिक म्हणजे कोण रे भाऊ?” हा या स्पर्धेचा मध्यवर्ती विषय असून सध्याच्या साहित्यविश्वातील अनेक संवेदनशील प्रश्नांना हात घालण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या विषयांतर्गत साहित्यिक कुणाला म्हणावे, त्याची नेमकी व्याख्या काय, पुस्तक प्रकाशित झालेलाच साहित्यिक ठरतो का, साहित्यिक ठरवण्याचा अधिकार कुणाचा, पुरस्कार म्हणजे साहित्यिक असल्याचे प्रमाणपत्र आहे का, साहित्य संस्थांचे सदस्यत्व आणि साहित्यिकत्व यांचा संबंध कितपत योग्य आहे, तसेच वाचकांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती कधी थांबणार—अशा अनेक प्रश्नांचा सखोल ऊहापोह लेखातून व्हावा, अशी अपेक्षा आहे. वाचकच नसतील तर लेखनाचा उपयोग काय, हा मूलभूत मुद्दाही मांडला जावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी ५०० शब्दांची मर्यादा ठेवण्यात आली असून आकर्षक रोख रकमेची तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. तीन मान्यवर वाचकांकडून लेखांचे परीक्षण केले जाणार आहे. विजेत्यांना २७ मार्च रोजी होणाऱ्या “सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन” या कार्यक्रमात पारितोषिक वितरण करण्यात येईल.
स्पर्धकांनी आपले लेख PDF स्वरूपात swamirajprakashan@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. लेख पाठवण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ अशी आहे. साहित्यप्रेमी लेखक व नवोदितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



