प्रतिनिधी(भिमराव धुळप) : सध्या लोकसभेचे बगुल वाजले असले तरी कोण कोणाच्या बारा वाजवणार हे ४ जूनला समजेल असाच एक मतदार संघ आहे.तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ याठिकाणी शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे यांच्यात आणि शिवसेना (उबाठा) गटाचे अनिल देसाई हे उमेदवार रिंगणात उभे आहेत. खरी लढत या दोन शिवसैनिकामध्ये होणार आहे.लढत दोघांची असली तर या मतदार संघात किंगमेकर च्या भूमिकेत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व विद्यमान आमदार वर्षाताई गायकवाड असणार आहेत. संपूर्ण मतदार संघात त्यांनी उत्तम बांधणी केली आहे. या मतदार संघातून दोनवेळा त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे खासदार म्हणून निवडून गेले होते.त्याचा अभ्यास गायकवाड यांच्याकडे अगोदर आहेच,मात्र जशा त्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या तेव्हापासून त्यांनी मुंबईच्या प्रत्येक मतदार संघात काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु सर्वात जास्त लक्ष त्यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदार संघात ठेवले होते.त्यांचीही लोकसभा लढवायची इच्छा होती.पण इंडिया आघाडीच्या वाटाघाटीत हा मतदार संघ शिवसेनेला म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे गेली आहे. त्यामुळे वर्षाताई गायकवाड यांनी आघाडी धर्म आमच्याकडून पाळला जाईल असे सांगितले असले तरी सर्वात जास्त लीड हे धारावी मतदार संघातून दिले जाईल असे आश्वासन दिले आहे.त्यामुळे वर्षाताई या कोणाच्या बारा वाजवतील हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. संपूर्ण मतदार संघाचा आढावा घेतला तर इतर विधानसभा मतदार संघांपैकी धारावीतून वर्षाताई गायकवाड या वरचढ असणार आहेत. थोडक्यात काय तर दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील खासदार कोण ? या वर्षाताई गायकवाड ठरवतील म्हणजेच त्या या मतदार संघाच्या किंगमेकर असतील हे तितकेच खरे ठरणार आहे.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात. तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात.सध्या या मतदार संघांपैकी दोन शिवसेना ते पण शिंदे गटासोबत,दोन भाजपा तर एक राष्ट्रवादी आणि एक काँग्रेस तर एक उबाठा शिवसेनेसोबत आहे.तरीही येथील मतदार हे दलित आणि मुस्लिम मतदार आहेत,तर काही संमिश्र स्वरूपाचे आहेत.त्यामुळे वडाळा, धारावी, चेंबूर असे दलित पट्ट्यातील मतदार हे निर्णायक ठरणार आहेत.
या मतदारसंघात इतर विभागांप्रमाणे मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदारसंघात कष्टकरी, अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या राहतात. या मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनताही जास्त दिसून येते.
राजकीय ताकद कुणाची ?
जर विधानसभा मतदारसंघानुसार विचार केला तर अणुशक्ती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले. ते या विधानसभेच्या पहिल्या अडीच वर्षांत मंत्रीही होते. ते सध्या अजित पवार गटात आहेत.
त्यानंतर चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर विजयी झाले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत.
धारावीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या. सायन कोळीवाडा येथे भाजपाचे कॅ. तमिलसेल्वन विजयी झाले तर वडाळ्यात विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आणि भाजपातर्फे उमेदवार असणारे कालीदास कोळंबकर विजयी झाले.
उमेदवारासमोरील आव्हाने
मुंबईत धारावी मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे. धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेकडे सायन परिसर आणि उत्तेरेच्या दिशेला मिठी नदी आहे. अशा या धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आता सुरू होत आहे. अदानी समुहाने लिलाव जिंकल्यानंतर आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला सुरूवात होईल. धारावीच्या पुनर्विकासात केवळ झोपड्यांचा पुनर्विकास हाच केवळ कळीचा मुद्दा नाहीय. तर लघु उद्योग, असंघिटत, संघटित कामगार आणि विविध जाती,धर्माचे समुदाय अशा सगळ्यांच्या सहतमीने त्यांना सोबत घेवून हा प्रकल्प राबवण्याचं सर्वात मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीयदृष्ट्या धारावी महत्त्वाची आहे. कारण धारावीची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे आणि मोठ्या संख्येने अल्पसंख्याक लोक राहत असल्याने राजकीय पक्षांसाठी ती एक गठ्ठा ‘वोटबँक’ आहे असे अनेकजण सांगत आहेत.
धारावी दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा आणि विधानसभा मतदासंघात मोडतो. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या (एससी) उमेदवारांसाठी राखीव आहे. या मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेनेचं प्राबल्य आहे.
2009 पासून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड या मतदारसंघात तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड याच मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.
तर शिवसेनेचे राहुल शेवाळे या मतदारसंघाचे खासदार आहेत.
धारावीत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत तर काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 नगरसेवक असले तरी आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाजवादी पार्टी या पक्षाचे उमेदवारही या भागात स्पर्धेत असतात.
2024 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा गट एकत्र आले आहेत आणि त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा असल्यामुळे या निवडणुकीत कोणाला यश मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मात्र दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात धारावी विधानसभेची मते निर्णायक ठरणार आहेत.
त्यामुळे बघायला गेलं तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व विद्यमान आमदार वर्षाताई गायकवाड या संपूर्ण दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाच्या किंगमेकर ठरणार यामध्ये शंका घेण्याचे कारण नसणार आहे. म्हणजेच थोडक्यात वर्षाताई गायकवाड या किंगमेकर असतील.