मुंबई प्रतिनिधी – भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते ॲड धनंजय जुन्नरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
पश्चिम उपनगर ते पालघर सफाळा पर्यंतचे रुग्ण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ३६५ खाटांचे भगवती रुग्णालय पुनर्विकासानंतर 1000 खाटांचे होईल असे सांगून प्रत्यक्षात 490 खाटांचे होत आहे, त्यातील केवळ 147 खाटा सामान्य दराने देण्याचा कुटील डाव मनपा प्रशासनाने आखलेला आहे. हा डाव हाणून पाडण्याचे काम महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष करेल असे प्रतिपादन धनंजय जुन्नरकर यांनी केलेले आहे.
पूर,रेल्वे, प.द्रु. मार्गा वरील अपघात,बॉम्ब ब्लास्ट, श्वान दंश ते सर्प दंश असे विविध रुग्ण दाखल होण्याचे मुंबईतील एकमेव रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या रुग्णालयाला खाजगी हातांमध्ये सोपवण्याचे कार्य सुरू झालेले आहे.
मुंबईच्या करदात्यांचे 500 कोटी रुपये खर्च करून तयार झालेले रुग्णालय केवळ 55 कोटी जंगम मालमता , ३०० खाटांचे अथवा १०० खाटांचे रुग्णालय चालविण्याचा ५ वर्षाचा अनुभव असलेल्या संस्थेस निविदे च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. निविदेनुसार फक्त (१४७ खाटा) मुंबई शहर व उपनगरातील पिवळ्या/ भगव्या रेशन कार्ड धारक, महापालिका कर्मचारी, नगरसेवक व कुटुंबीय यांना महापालिका रूग्ण गणले जाईल व त्यांना निश्चित दरांनी रूग्ण सेवा दिली जाईल.इतर रूग्णांना खाजगी रूग्णालयाप्रमाणे दर आकारण्यात येईल. विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात येणार नाही.
मुंबई महापालिका कायदा १८८८ कलम ६१ अन्वये रूग्णसेवा पुरविणे महापालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे असे स्पष्ट असताना व
उत्तर मुंबईतून सर्वात जास्त कर महापालिकेला/ शासनाला मिळत असताना अशा वेळी येथील नागरिकांना विनामूल्य अथवा कमी दराने आरोग्य सेवा महापालिकेने उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य होते.
परंतु महापालिकेचे वर्तन विपरीत आहे.
महापालिकेने सदर धोरण रद्द करावे व निविदा रद्द कराव्यात व मुंबई महापालिकेने अंधेरी ते दहिसर ठाणे पालघर येथील नागरिकांना उपयुक्त असलेल्या भगवती रूग्णालयाचे प्रचलन व परिरक्षण करून येथील गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी अशी मागणी नागरिक, विविध सामाजिक संस्था , काँग्रेस पक्ष व शिवसेना ( उबाठा) करीत आहे.
माजी आमदार विनोद घोसाळकर, विलास पोतनीस , ॲड संदेश कोंडविलकर ॲड अशोक सुत्राळे, भूषण पाटील,माजी नगरसेवक उदेश पाटेकर हर्षद कारकर, चेतन कदम, तेजस्वी घोसाळकर सुजाता पाटेकर, श्वेता कोरगांवकर सिमंतिनी नारकर सिनेट सदस्य शशिकांत झोरे व मिलींद साटम तसेच संजय भोसले अशोक महामुणकर शुमदा शिंदे आदिनी देखील ही मागणी केलेली आहे.