प्रतिनिधी : आपल्या मुलीची हत्या ही लव्ह जिहादमुळे झाल्याचा आरोप एका काँग्रेस नेत्याने केला आहे. हुबळी येथील महाविद्यालयात या तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दरम्यान, तिच्या वडिलांनी लव्ह जिहाद हेच आपल्या मुलीच्या हत्येला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
या तरुणीचं नाव नेहा हिरेमठ असं आहे. ती हुबळीच्या महाविद्यालयात मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशनच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या वर्गातील फैयाज खोंडुनायक नावाच्या विद्यार्थ्याने तिच्यावर चाकूचे सात वार करून तिची हत्या केली. आपले आणि नेहाचे प्रेमसंबंध होते, पण गेल्या काही काळापासून नेहा आपल्याला टाळत होती, असा जबाब फैयाज याने पोलिसांना दिला आहे.
नेहाच्या मृत्युनंतर राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. दरम्यान, नेहा हिचे वडील आणि काँग्रेसचे आमदार निरंजन हिरेमठ यांनी हा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला आहे. फैयाजला माझ्या मुलीला यात अडकवायचं होतं. दीर्घ काळ त्याने यासाठी कारस्थानं केली होती. तिला अडकवण्याचं कारस्थान यशस्वी झालं नाही तर तिला संपवण्याचाही त्याचा हेतू होता. तो तिला धमकी देत होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या मुलीसोबत जे झालं ते साऱ्या देशाने पाहिलं. यात माझं वैयक्तिक प्रकरण येत नाही, कारण आरोपी माझा नातेवाईक नाही, असं हिरेमठ म्हणाले आहेत.